Satara: भोळी येथे अपघातात चुलता-पुतण्याचा मृत्यू, घटनास्थळावरून कंटेनरचालकाचे पलायन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 15:25 IST2025-06-02T15:24:22+5:302025-06-02T15:25:44+5:30

ग्रामस्थांचा रास्ता रोकोचा इशारा

Cousin and nephew die in accident in Bholi Satara, container driver flees from the scene | Satara: भोळी येथे अपघातात चुलता-पुतण्याचा मृत्यू, घटनास्थळावरून कंटेनरचालकाचे पलायन

Satara: भोळी येथे अपघातात चुलता-पुतण्याचा मृत्यू, घटनास्थळावरून कंटेनरचालकाचे पलायन

शिरवळ : खंडाळा तालुक्यातील शिरवळ-लोणंद रस्त्यावरील भोळी येथील एसटी थांब्याजवळ कंटेनरने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत भोळी येथील चुलता-पुतण्याचा मृत्यू झाला. अमोल रघुनाथ चव्हाण (वय ४०) व धनंजय बबनराव चव्हाण (५६, दोघे, रा. भोळी, ता. खंडाळा), अशी मृत चुलता-पुतण्याची नावे आहेत. हा अपघात शनिवारी दुपारी चारच्या सुमारास झाला.

भोळी येथील अमोल चव्हाण व धनंजय चव्हाण हे दोघे शिरवळ येथे नातेवाइकांच्या साखरपुडा कार्यक्रमासाठी शनिवारी दुचाकी (एमएच ११ सीएक्स ११६५)ने आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर हे दोघे शिरवळहून भोळीकडे परत येत असताना सायंकाळी चारच्या दरम्यान भोळी गावच्या हद्दीत असणाऱ्या एसटी बस थांब्याजवळ पाठीमागून भरधाव कंटेनर (केए ५१ एएच ६५८२)ने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दोघेही गंभीर जखमी झाले. कंटेनरचालकाने अपघातानंतर घटनास्थळावरून पलायन केले. 

अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी शिरवळ पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी व शिरवळ रेस्क्यू टीमचे सदस्य तत्काळ दाखल झाले. त्यांनी दोघाही जखमींना शिरवळ येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे अमोल चव्हाण यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले, तर गंभीर जखमी धनंजय चव्हाण यांचा उपचारादरम्यान रविवारी मृत्यू झाला.

दोघांच्याही मृतदेहाचे विच्छेदन शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात येऊन ते नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. रोहन चव्हाण याने शिरवळ पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून कंटेनरचालक गौरव विजय ढोरे (वय २२, रा. गडकुमली, ता. साकोली, जि. भंडारा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक कीर्ती म्हस्के अधिक तपास करीत आहेत.

रस्त्याच्या कामात हलगर्जीपणा; अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा

भोळी येथे एसटी बसस्थानक याठिकाणी कंटेनरच्या अपघातामध्ये एकाच घरातील चुलता-पुतण्याचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. यामध्ये लोणंद-शिरवळ रस्त्याच्या कामामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करेपर्यंत भोळी ग्रामस्थ सोमवार, दि. २ जून रोजी रास्ता रोको करण्याचा इशारा भोळी ग्रामस्थांनी शिरवळच्या पोलिस निरीक्षकांना निवेदनाद्वारे दिला आहे.

Web Title: Cousin and nephew die in accident in Bholi Satara, container driver flees from the scene

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.