कोल्हापूरच्या कुरिअर बॉयवर कऱ्हाड येथे हल्ला; ७० लाखांचे दागिने लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 12:31 IST2025-07-31T12:31:18+5:302025-07-31T12:31:48+5:30
एकजण ताब्यात

कोल्हापूरच्या कुरिअर बॉयवर कऱ्हाड येथे हल्ला; ७० लाखांचे दागिने लंपास
कऱ्हाड : वराडे (ता. कऱ्हाड) गावच्या हद्दीत एका हॉटेलनजीक मंगळवारी मध्यरात्री कोल्हापुरातील एका कुरिअर कंपनीच्या कुरिअर बॉयला मारहाण करून त्याच्याकडील सुमारे ७० लाखांचे दागिने असलेली बॅग चोरट्यांच्या टोळीने लंपास केल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी तळबीड पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून, त्याच्या साथीदारांचा शोध सुरू जात आहे. राहुल दिनकर शिंगाडे (वय २८, रा. शिंगणापूर, ता. माण), असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातील कासार गल्लीतील कृष्णा कुरिअरकडून काही सोन्याचा ऐवज मुंबईला पाठविला जाणार होता. कंपनीतील कुरिअर बॉय प्रशांत शिंदे हे मंगळवारी रात्री एका बॅगमध्ये तो ऐवज घेऊन महामंडळाच्या कोल्हापूर ते मुंबई स्लिपर कोच बसने मुंबईला जाण्यासाठी निघाले. बस मध्यरात्री एकच्या सुमारास वराडे गावच्या हद्दीतील थांबली. त्याठिकाणी बसमधील सर्व प्रवासी खाली उतरले.
कुरिअर बॉय प्रशांत शिंदे हेही सोन्याचा ऐवज असलेली बॅग सोबत घेऊन लघुशंकेसाठी उतरले. त्यानंतर ते परत बसमध्ये चढत असताना चोरट्यांच्या टोळीने त्यांच्यावर हल्ला केला. त्यांना मारहाण करीत सोन्याच्या ऐवजाची बॅग हिसकावली व चोरटे पसार झाले.
याबाबतची माहिती मिळताच तळबीड पोलिस ठाण्याचे अधिकारी तसेच कर्मचारी त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी घटनेचा तपास सुरू केला. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी राहुल शिंगाडे या संशयिताला ताब्यात घेऊन अटक केले आहे. त्याच्याकडून साथीदारांची नावे निष्पन्न झाली असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.