पुण्यानंतर साताऱ्यातही काँग्रेसला धक्का बसणार, मोठा नेता 'राष्ट्रवादी'च्या वाटेवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 12:49 IST2025-03-10T12:45:12+5:302025-03-10T12:49:17+5:30
'घड्याळा'तील कोणते अचूक टाइमिंग शोधलेय

पुण्यानंतर साताऱ्यातही काँग्रेसला धक्का बसणार, मोठा नेता 'राष्ट्रवादी'च्या वाटेवर
प्रमोद सुकरे
कऱ्हाड: राजकारणात कोण कोणाचा कायमचा शत्रू अथवा मित्र नसतो असे सांगितले जाते. पण आपल्या वडिलांच्या मित्रांच्या ऋणानुबंधाची जाणीव ठेवत त्यांच्या मुलाच्या राजकीय वाटचालीत 'मदत व पुनर्वसना'साठी वाई- खंडाळ्याचे दोन बंधू नेते सरसावल्याचे समोर आले आहे. त्याचाच भाग म्हणून सातारा जिल्ह्यातील काँग्रेसचा एक मोठा नेता, प्रदेश काँग्रेसचा पदाधिकारी आता राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे खात्रीशीर मानले जात आहे. येत्या महिनाभरात त्यांचा पक्षप्रवेश झाला तर नवल वाटायला नको.
एकेकाळी सातारा जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर तो राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाऊ लागला. आता मात्र या जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती पूर्णता बदलली आहे. नाही म्हटलं तरी त्याची सल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मनात कायम आहे. म्हणूनच सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस बळकट करण्यावर त्यांचे लक्ष दिसत आहे. त्याचाच भाग म्हणून अजित पवारांनी 'या' काँग्रेसच्या नेत्याला थेट ऑफर दिली असून वाई- खंडाळ्याच्या दोन नेते बंधूनी यासाठी पायघड्या घातल्याचे बोलले जातेय.
स्वातंत्र्य सैनिकांची पार्श्वभूमी असणारे ,अनेक वर्ष काँग्रेसचा वारसा जोपासणारे घराणे म्हणून माजी मंत्री विलासराव पाटील- उंडाळकर यांच्या घराण्याची ओळख आहे. मात्र सत्ते शिवाय कार्यकर्ते थांबत नाहीत, लोकांच्या दारात जाण्यापूरती तरी सत्ता असली पाहिजे हे ओळखून त्यांचे वारसदार अँड. उदयसिंह पाटील हा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.
पण हा निर्णय घेत असताना 'रयत' संघटना आपल्याबरोबर असणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन नुकताच त्यांनी प्रमुख कार्यकर्त्यांचा एक मेळावा घेतला.त्यात कार्यकर्त्यांची मनेही जाणून घेतली. त्यांना चांगला प्रतिसाद मिळाल्याचे समजते. त्यामुळे आता अजून एक विस्तृत मेळावा घेऊन आपण आपला निर्णय ठरवू असा सावध पवित्रा त्यांनी घेतला आहे. त्यामुळे नजीकच्या काळात या बाबतीत घडामोडी अधिक गतिमान होताना दिसतील.अन अंतिम निर्णय काय होतोय हे पहाण्यासाठी थोडे थांबावे लागेल.
'घड्याळा'तील कोणते अचूक टाइमिंग शोधलेय
खरंतर लोकसभा निवडणुकी पूर्वीपासूनच अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 'उदयसिहां'ना गळ टाकला आहे. आजवर त्या दोघांच्यात ३ बैठकाही झालेल्या आहेत. पण त्याला मूहूर्त स्वरूप आले नाही. आता मात्र उदयसिंहानी राष्ट्रवादीच्या 'घड्याळा'तील नेमके कोणते अचूक टाइमिंग शोधले आहे ? हे नजीकच्या काळात समोर येईलच.
काय शब्द दिलाय?
उपमुख्यमंत्री अजित पवार व उदयसिंह पाटील यांच्यात झालेल्या बैठकीत पवारांनी पाटलांना शब्द दिल्याचे सांगितले जाते. पण नेमका काय शब्द दिलाय हे समोर येत नाही. उचित सन्मान करण्याचा शब्द दिल्याचे कार्यकर्ते बोलतात अन अजित पवार दिलेला शब्द पाळणारा नेता आहे अशीही कार्यकर्त्यांच्या चर्चा आहे बरं.
'सह्याद्री'वर बैठक
दोन दिवसापूर्वी देखील राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील यांनी पुढाकार घेत उपमुख्यमंत्री अजित पवार व अँड. उदयसिंह पाटील यांच्यात 'सह्याद्री'वर बैठक घडवून आणली. या बैठकीतील तपशील यथावकाश समोर येईलच.