99th Marathi Sahitya Sammelan: लेखणीची ‘तलवार’ करणाऱ्यांपुढे ‘पानिपत’कार नतमस्तक!, विश्वास पाटील यांनी साहित्यिकांच्या स्मृतींना दिला उजाळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 19:21 IST2026-01-01T19:18:27+5:302026-01-01T19:21:02+5:30
99th Marathi Sahitya Sammelan: साहित्याच्या पाऊलखुणांना वंदन

99th Marathi Sahitya Sammelan: लेखणीची ‘तलवार’ करणाऱ्यांपुढे ‘पानिपत’कार नतमस्तक!, विश्वास पाटील यांनी साहित्यिकांच्या स्मृतींना दिला उजाळा
सचिन काकडे
सातारा : ऐतिहासिक सातारा नगरीत गुरुवारपासून (दि. ४) ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सनईचौघडे वाजणार आहेत. या संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष आणि ‘पानिपत’ या कादंबरीचे लेखक विश्वास पाटील यांचे बुधवारी साताऱ्यात आगमन झाले. मात्र, साताऱ्यात पाऊल ठेवण्यापूर्वी त्यांनी पुणे, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांतील थोर साहित्यिक आणि महापुरुषांच्या स्मारकांना भेट देऊन अभिवादन करण्याचा एक आगळावेगळा ‘साहित्यिक प्रवास’ पूर्ण केला.
साहित्याच्या पाऊलखुणांना वंदन
१. अध्यक्ष पदाची धुरा सांभाळण्यापूर्वी विश्वास पाटील यांनी मंगळवार आणि बुधवार असे दोन दिवस या दौऱ्यासाठी राखीव ठेवले होते. मंगळवारी (दि. ३०) त्यांनी तळेगाव दाभाडे (पुणे) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानाला भेट देऊन संविधानाच्या शिल्पकाराला अभिवादन केले.
२. नायगाव (ता. खंडाळा, जि. सातारा) येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मस्थळी आणि मर्ढे (ता. सातारा) येथील आधुनिक मराठी कवितेचे जनक बा. सी. मर्ढेकर यांच्या स्मारकाला भेट देऊन साहित्यातील क्रांतीच्या वारसाला उजाळा दिला. येथे त्यांनी मर्ढे ग्रामस्थांशी संवादही साधला.
३. बुधवारी (दि. ३१) सकाळी ते सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील येडे मच्छिंद्र येथे जाऊन ‘प्रतिसरकार’चे प्रेरणास्थान क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या स्मारकासमोर नतमस्तक झाले. त्यानंतर रेठरे हरणाक्ष येथे लोकशाहीर पठ्ठे बापूराव यांच्या जन्मभूमीला भेट देऊन त्यांनी लोकसंस्कृतीचा सन्मान केला.
४. साताऱ्यात प्रवेश करण्यापूर्वी कराड येथील प्रीतिसंगमावर जाऊन त्यांनी महाराष्ट्राचे शिल्पकार तथा पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाला पुष्पहार अर्पण केला.
नववर्षाची पहाट साहित्याच्या सूर्योदयाने
सातारकरांची नववर्षाची पहाट यंदा साहित्य संमेलनाच्या रुपाने उजाडणार आहे. गुरुवार (दि. १) ते रविवार (दि. ४) असे सलग चार दिवस साहित्याची ही मेजवानी चालणार असून, यामध्ये ज्ञानपीठ विजेत्या लेखकांपासून ते तरुण साहित्यिकांपर्यंत दिग्गजांचा मेळा भरणार आहे.
या संमेलनाच्या निमित्ताने साताऱ्यात वैचारिक मंथन आणि शब्दांची आतषबाजी अनुभवण्यासाठी रसिक मोठ्या संख्येने दाखल झाले असून, अवघी सातारा नगरी साहित्यमय झाली आहे.