कचरा डेपोतील आगप्रकरणी इंदोरच्या ठेकेदारावर गुन्हा, सातारा पालिकेने उचलली पावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 12:30 IST2026-03-14T12:29:44+5:302026-03-14T12:30:54+5:30
गेल्या चार दिवसांपासून ही आग धुमसत असून, अद्यापही ती विझलेली नाही.

संग्रहित छाया
सातारा : ‘गेल्या चार दिवसांपासून सोनगाव कचरा डेपोत उसळलेला भीषण आगडोंब अनुभवल्यानंतर आणि कोट्यवधी रुपयांचे नुकसान सोसल्यानंतर अखेर पालिका प्रशासनाने कठोर पावले उचलली. आगीच्या घटनेसाठी संबंधित ठेकेदाराचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा ठपका ठेवत, पालिकेने इंदोरच्या इको सेव्ह या कंपनीचे संचालक पुनीत शिसोदिया यांच्याविरोधात पाेलिसांत तक्रार दिली असून, पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
आरोग्य निरीक्षक राकेश गलीयल यांनी याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सातारा शहरालगतच्या सात एकरमध्ये पसरलेल्या कचऱ्याला दि. ९ मार्च रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आग लागली. आगीचे तांडव आणि अपायकारक धुराचा सामना सोनगाव, जकातवाडीलगतच्या गावांना करावा लागला. गेल्या चार दिवसांपासून ही आग धुमसत असून, अद्यापही ती विझलेली नाही.
या गंभीर घटनेची नगरसेवक राजू गोरे, नगरसेविका मुक्ता लेवे, नगरसेविका सिद्धी पवार यांनीदेखील गांभीर्याने दखल घेत कारवाईची मागणी केली होती. अखेर पालिका प्रशासनाकडून कारवाईचे पाऊल उचलण्यात आले. आरोग्य निरीक्षक राकेश गलीयल यांनी आगीच्या घटनेसाठी संबंधित कंपनीचा निष्काळजीपणा जबाबदार धरून इको सेव्ह प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालकांविरोधात सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
जे-जे जबाबदार त्यांच्यावर कारवाई
कचरा डेपोत यापूर्वीही आग लागली आहे. मात्र, यावेळी लागलेली आग ही अत्यंत भीषण आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी पालिकेच्या आरोग्य व अग्निशमन विभागाची यंत्रणा अहोरात्र झटत आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा प्रकार नागरिकांच्या जीविताशी खेळण्यासारखाच असल्याने या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, कोणाची गय केली जाणार नाही. जे जे जबाबदार असतील त्या सर्वांवर कारवाई केली जाईल. या घटनेत पालिकेच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. त्याचा पोलिसांच्या माध्यमातून पंचनामा सुरू आहे.
संबंधित नुकसान हे ठेकेदाराकडून वसूल केले जाईल, अशी माहिती नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी दिली. शुक्रवारी सायंकाळी पालिकेत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष ॲड. दत्तात्रय बनकर, आरोग्य सभापती धनंजय जांभळे, नियोजन सभापती अशोक शेडगे आदी उपस्थित होते.