संमेलनाध्यक्ष खोटे बोलतात, विश्वास पाटील यांच्या भावाचाच गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 17:50 IST2025-09-24T17:49:43+5:302025-09-24T17:50:20+5:30

कुटुंबातच नवा वाद : भावाचीच पत्रकार परिषदेत जोरदार टीका

Brother Suresh Patil makes serious allegations against Vishwas Patil, the president of the All India Marathi Sahitya Sammelan over his election | संमेलनाध्यक्ष खोटे बोलतात, विश्वास पाटील यांच्या भावाचाच गंभीर आरोप

संमेलनाध्यक्ष खोटे बोलतात, विश्वास पाटील यांच्या भावाचाच गंभीर आरोप

सातारा : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नवनियुक्त अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या निवडीवरून साहित्य वर्तुळात नवा वाद उफाळून आला आहे. खुद्द त्यांचे बंधू आणि ‘नक्षल बारी’ कादंबरीचे लेखक सुरेश पाटील यांनीच या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. विश्वास पाटील हे थापाडे असून, त्यांची निवड बोगस असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. या निवडीमागे काही तडजोडी झाल्याचा संशय व्यक्त करत त्यांनी महामंडळाच्या निर्णयाची चौकशी करण्याची मागणीही केली.

सातारा येथील शासकीय विश्रामगृहात मंगळवारी दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत सुरेश पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, कौटुंबीक संबंधांमुळे मी सुरुवातीला या निवडीचे स्वागत केले. पण, आता निवडीनंतर त्यांनी आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली आहे. सुरेश पाटील यांनी विश्वास पाटील यांच्या दोन प्रमुख कादंबऱ्यांवरही तीव्र शब्दांत टीका केली आहे. झाडाझडती ही शतकातील महाबोगस कादंबरी असून, संभाजी कादंबरीत इतिहासाचा चुकीचा संदर्भ दिल्याचा आरोप त्यांनी केला.

विश्वास पाटील यांनी केलेल्या ''कमी बुद्धीच्या लोकांच्या हाताखाली काम करावे लागते,'' या विधानावरही सुरेश पाटील यांनी आक्षेप घेतला. हे विधान जातीयवादी असून, विशिष्ट समाजाला खूश करण्यासाठी करण्यात आल्याचे ते म्हणाले. महामंडळाने अध्यक्षपदाची निवड करताना त्यांच्या बोगस साहित्याची पडताळणी केली नाही. त्यामुळे इथे काही व्यवहार तर झाला नाही ना, असा संशय बळावतो. याबाबत महामंडळाचा मी निषेध व्यक्त करतो. तसेच, विश्वास पाटील अध्यक्ष व्हावेत, यासाठी जे कोणी प्रयत्न करत होते, त्यांच्यासह या प्रकरणात काही तडजोड झाली आहे का? याची चौकशी व्हावी, अशी मागणी यावेळी सुरेश पाटील यांनी केली आहे.

..कुठेही बोलवा मी तयार

साहित्य चौर्याचा आरोप सिद्ध झाल्यास मी लेखणी सोडेन, असे विश्वास पाटील म्हणाले होते, यावर उत्तर देताना सुरेश पाटील म्हणाले, तुम्ही कुठेही कार्यक्रम ठेवा, मी प्रत्येक कंटेंटवर बोलायला तयार आहे. या पत्रकार परिषदेत शिवाजी राऊत यांनीही, हे संमेलन बहुजनांच्या व्यथा मांडणारे नसून, उच्चवर्गीयांचे असल्याचा आरोप केला.

English summary :
Vishwas Patil's brother, Suresh Patil, alleges the literary meet president is a liar and his selection bogus. He suspects compromises and demands investigation into the decision, criticizing Patil's writings and casteist remarks. He challenges Patil to a public debate on literary theft.

Web Title: Brother Suresh Patil makes serious allegations against Vishwas Patil, the president of the All India Marathi Sahitya Sammelan over his election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.