दोन्ही काँग्रेससह भाजपचीही ताकद पणाला! -कोरेगावातील राजकीय हालचालींना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 12:58 AM2019-06-07T00:58:46+5:302019-06-07T01:01:03+5:30

कोरेगावच्या पहिल्या-वहिल्या नगराध्यक्षांचा अडीच वर्षांचा कार्यकाल १४ जून रोजी संपत असून, जिल्हा प्रशासनाने नगराध्यक्षासह उपनगराध्यक्षपदासाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे

Both the Congress and the strength of the Congress together! - The pace of political activity in Korgaon | दोन्ही काँग्रेससह भाजपचीही ताकद पणाला! -कोरेगावातील राजकीय हालचालींना वेग

दोन्ही काँग्रेससह भाजपचीही ताकद पणाला! -कोरेगावातील राजकीय हालचालींना वेग

Next
ठळक मुद्देनगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर

साहिल शहा ।
कोरेगाव : कोरेगावच्या पहिल्या-वहिल्या नगराध्यक्षांचा अडीच वर्षांचा कार्यकाल १४ जून रोजी संपत असून, जिल्हा प्रशासनाने नगराध्यक्षासह उपनगराध्यक्षपदासाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. दि. १० ते १४ जून या कालावधीत ही प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.

दरम्यान, नगरपंचायतीतील पक्षीय बलाबल पाहता दोन्ही काँग्रेस सत्तेत भागीदार आहेत. मात्र, भाजपची जुळवून घेत नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांचा गट देखील आता सक्रिय झाला आहे. एकंदरीत दोन्ही काँग्रेससह नगरपंचायतीत प्रवेश करण्यासाठी भाजप आपली ताकद पणाला लावत आहे.

कोरेगावात नगरपंचायतीची स्थापना झाल्यानंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राष्टÑवादी काँग्रेसने ९ जागांवर विजय मिळवला होता. तर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किशोर बाचल व किरण बर्गे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला ८ जागांवर समाधान मानावे लागले होते. नगराध्यक्षपद हे सर्वसाधारणसाठी खुले असल्याने राष्टÑवादीच्या राजाभाऊ बर्गे यांची निवड झाली होती. उपनगराध्यक्षपदी जयवंत पवार यांना संधी देण्याचा निर्णय आमदार शिंदे यांनी घेतला होता.

अडीच वर्षांच्या पहिल्याच कार्यकालामध्ये नगरपंचायतीच्या राजकारणामध्ये आमुलाग्र बदल झाला आणि नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांनी काही कारणांनी आमदार शिंदे यांच्याबरोबर फारकत घेत स्वत:चा सवतासुभा मांडला. इकडे राष्टÑवादीत अंतर्गत धुसफूस सुरू असतानाच काँग्रेसमध्ये देखील किशोर बाचल आणि किरण बर्गे यांच्या सदस्यांमध्ये अंतर्गत मतभेद होते. नगराध्यक्षांनी काँग्रेसच्या काही नगरसेवकांना बरोबर घेत स्वत:चा स्वतंत्र गट तयार केला. दरम्यानच्या काळात जयवंत पवार यांनी उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि त्याठिकाणी राष्टÑवादीच्या संजय पिसाळ यांना संधी देण्याचा निर्णय आमदार शिंदे यांनी घेतला.

नगराध्यक्ष बर्गे यांच्या गटाने भाजपचे कोरेगाव विधानसभा मतदारसंघ प्रमुख महेश शिंदे यांच्याशी जुळवून घेत राज्य शासनाकडून विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद करून घेतली. लोकसभा निवडणुकीत देखील या गटाने महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांचे खुलेपणाने काम केले. त्यासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नगराध्यक्षांच्या निवासस्थानी तळ ठोकून यंत्रणा कार्यान्वित केली होती. राष्टदीबरोबर टोकाची भूमिका घेत नगराध्यक्षांनी आमदार शिंदे यांची नगरपंचायतीच्या राजकारणात कोंडी करण्याचा प्रयत्न केला.

नगराध्यक्षपद हे इतर मागास प्रवर्गासाठी राखीव झाल्याने राष्टवादी, काँग्रेस आणि भाजपने आपल्या हालचाली गतिमान केल्या आहेत. राष्टवादीचे ८ आणि काँग्रेसच्या किरण बर्गे यांच्या गटाचे ३ अशा ११ नगरसेवकांची आघाडी असून, काँग्रेसच्या किशोर बाचल यांच्या गटाच्या ५ नगरसेवकांसह नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे असे ६ जण एकत्रित आहेत. शांतीनगर येथील भुयारी गटार योजनेवरून नगराध्यक्षांसह नगरसेवकांनी केलेल्या लाक्षणिक उपोषणाला महेश शिंदे व किशोर बाचल यांनी उपस्थिती दर्शवित पाठिंबा दिला होता. त्याचबरोबर भाजपच्या इफ्तार पार्टीच्या फलकावर नगराध्यक्षांचे छायाचित्र झळकत असल्याने आगामी वाटचालीची ती नांदी आहे.


राष्टवादी-काँग्रेसची व्यापक बैठक...
आमदार शशिकांत शिंदे यांनी दोनच दिवसांपूर्वी ल्हासुर्णे येथील निवासस्थानी राष्टÑवादीच्या नगरसेवकांची बैठक घेऊन, त्यांची मते जाणून घेतली होती. ९ जून रोजी खासदार उदयनराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, आमदार शशिकांत शिंदे व किरण बर्गे यांची एकत्रित बैठक होणार असून, त्यामध्ये अडीच वर्षांसाठी नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष निवडीसाठीचा फॉर्म्युला ठरणार आहे. इतर मागास प्रवर्गातील सर्वच सदस्यांना संधी देण्याच्या दृष्टीने निश्चित कालावधी प्रत्येकाला देण्याचा विचार सध्या नेतृत्व करत असल्याचे सांगण्यात आले.

हे आहेत प्रमुख दावेदार...
राष्टÑवादी काँग्रेसकडून जयवंत पवार, रेश्मा जाधव, सुलोचना फडतरे हे तर किरण बर्गे यांच्या गटाकडून रेश्मा कोकरे या प्रमुख दावेदार आहेत. त्यांच्याबरोबर काँग्रेसच्याच पूनम मेरुकर यांना संधी मिळू शकते. उपनगराध्यक्षपदासाठी राष्टÑवादीकडून संजय पिसाळ यांच्यासह मंदा बर्गे, संगीता बर्गे या प्रबळ दावेदार असून, किरण बर्गे यांच्या गटाकडून अर्चना बर्गे व बच्चूशेठ ओसवाल हे दावेदार मानले जातात.

सत्तांतरासाठी चमत्कार घडविण्याचा प्रयत्न ?
किशोर बाचल यांच्या गटाकडून बाळासाहेब बाचल हे प्रमुख दावेदार असून, त्यांनी यापूर्वी सरपंचपद भूषविले आहे. राष्टÑवादी आघाडीतील नाराज नगरसेवकांशी संपर्क ठेवून सत्तांतरासाठी हा गट प्रयत्नशील राहिल्यास नगरपंचायतीच्या राजकारणामध्ये निश्चितपणे चमत्कार घडू शकतो. विद्यमान नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे नेमकी काय भूमिका घेतात, यावर सर्वकाही अवलंबून आहे.

Web Title: Both the Congress and the strength of the Congress together! - The pace of political activity in Korgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.