Satara: विहिरीत बुडालेल्या एकाचा दोन दिवसांनी आढळला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 15:35 IST2025-11-07T15:35:02+5:302025-11-07T15:35:17+5:30
शेतामध्ये गेले होते. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क होत नसल्याने नातेवाइकांनी परिसरात शोधाशोध केली

Satara: विहिरीत बुडालेल्या एकाचा दोन दिवसांनी आढळला मृतदेह
खंडाळा : खंडाळ्यातील बावडा रस्त्यावर असणाऱ्या एका विहिरीत बुधवारी एकजण बुडाल्याची भीती व्यक्त केली होती. यावर प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू, महाबळेश्वर ट्रेकर्स व शिरवळ रेस्क्यू टीमच्या अथक परिश्रमानंतर बुडालेल्या व्यक्तीचा मृतदेह मिळून आला आहे. संतोष सर्जेराव जाधव (वय ४९, रा. ता. खंडाळा) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, बुधवार, दि. ५ रोजी संतोष जाधव हे त्यांच्या खंडाळा बावडा रस्त्यावरील निंबूर मळा या ठिकाणी असणाऱ्या शेतामध्ये गेले होते. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क होत नसल्याने नातेवाइकांनी परिसरात शोधाशोध केली असता त्यांची एक चप्पल विहिरीबाहेर व एक चप्पल विहिरीत आढळून आली. त्यामुळे पाण्यामध्ये पडून मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली. बुधवारी शिरवळ रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी शोध मोहीम राबवली; परंतु पाण्याची खोली जास्त व विहीर अरुंद असल्याने शोध मोहीम थांबवण्यात आली.
गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू, महाबळेश्वर ट्रेकर्स व शिरवळ रेस्क्यू टीमच्या पथकांनी एकत्रितपणे शोध मोहीम राबवली. पाण्यातील कॅमेरा विहिरीमध्ये सोडत जवळपास ४५ फूट खोलीवरून तब्बल तीन तासांच्या प्रयत्नानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेहाचे विच्छेदन पूर्ण करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची नोंद खंडाळा पोलिस स्टेशनला करण्यात आली असून, अधिक तपास खंडाळा पोलिस करत आहेत.
बघ्यांची गर्दी, रेस्क्यू टीमला डोकेदुखी..
मृतदेह पाहण्यासाठी विहिरीच्या कडेने शेकडोंच्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. या बघ्यांच्या गर्दीमुळे रेस्क्यू टीमला शोध मोहिमेत मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागला.