Satara: पळशी येथे नीरा-देवधर कालव्यात आढळला मृतदेह; घातपाताची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 13:43 IST2026-03-09T13:42:32+5:302026-03-09T13:43:04+5:30
पळशी ग्रामपंचायत अधिकारी संपर्काबाहेर

Satara: पळशी येथे नीरा-देवधर कालव्यात आढळला मृतदेह; घातपाताची शक्यता
शिरवळ : पळशी गावच्या हद्दीत असणाऱ्या नीरा देवघर कॅनॉलच्या पाण्यात अंदाजे ३५ ते ४० वर्षीय युवकाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला आहे. दरम्यान, संबंधित युवकाचा घातपात आहे की आत्महत्या याबाबत शिरवळ पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.
शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शिंदेवाडी परिसरात असणाऱ्या नीरा देवघर कालव्यातील पाण्यामध्ये मृतदेह पाण्यात तरंगत असल्याची माहिती शिरवळ पोलिसांना शनिवार, ७ रोजी मिळाली. त्यानुसार शिरवळचे सहायक पोलिस निरीक्षक महादेव शिद, पोलिस उपनिरीक्षक शंकर पांगारे, सतीश आंदेलवार, पोलिस अंमलदार सुरेश मोरे, विजय शिंदे, अजय झुंजार, संजय केंगले, गृहरक्षक दलाचे जवान व शिरवळ रेस्क्यू टिमच्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पाण्याचा प्रवाह व झाडे-झुडपे तसेच अंधार पडल्याने शोधकार्यात अडथळा निर्माण होत होता. यावेळी रविवारी शिरवळ पोलिसांनी शिरवळ रेस्क्यू टीमच्या सहकार्याने शोधमोहीम राबविली असता पळशी गावच्या हद्दीत नीरा देवघर कालव्याच्या पाण्याच्या प्रवाहात अंदाजे सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. या वेळी शिरवळ ग्रामपंचायतच्या रुग्णवाहिकेच्या सहकार्याने मृतदेह शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणत शवविच्छेदन करण्यात आले.
दरम्यान, संबंधित युवकाचा घातपात असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून त्यादृष्टीने शिरवळ पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. या घटनेची पळशी पोलीस पाटील प्रिया दगडे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिस उपनिरीक्षक सतीश आंदेलवार तपास करीत आहे.
पळशी ग्रामपंचायत अधिकारी संपर्काबाहेर
पळशी येथे सडलेल्या अवस्थेत युवकाचा मृतदेह आढळल्यानंतर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करीत शिरवळ पोलिस तसेच पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी पळशी ग्रामपंचायत अधिकारी यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यावेळी तहसीलदार सुहास थोरात, गटविकास अधिकारी अनिल वाघमारे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर मृतदेहाबाबत सकारात्मक पर्याय रात्री उशिरा निघाला.