साताऱ्यात पुन्हा सत्तासंघर्ष पेटण्याची चिन्हे; सभापती निवडीतही भाजपची ‘ऑपरेशन लोटस’ची नीती!

By नितीन काळेल | Updated: March 25, 2026 19:23 IST2026-03-25T19:23:00+5:302026-03-25T19:23:23+5:30

राष्ट्रवादी-शिंदेसेना मात करणार? : प्रशासनासह राजकीय पक्षही ‘हाय टेन्शन’मध्ये

BJP Once Again Gears Up for Operation Lotus During the Election of Satara Zilla Parishad Chairpersons | साताऱ्यात पुन्हा सत्तासंघर्ष पेटण्याची चिन्हे; सभापती निवडीतही भाजपची ‘ऑपरेशन लोटस’ची नीती!

साताऱ्यात पुन्हा सत्तासंघर्ष पेटण्याची चिन्हे; सभापती निवडीतही भाजपची ‘ऑपरेशन लोटस’ची नीती!

नितीन काळेल

सातारा : सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीवेळी भाजपने ‘ऑपरेशन लोटस’ राबवून सत्ता काबीज केली असून, आता चार सभापतींच्या निवडीकडे लक्ष लागले आहे. यासाठी चार एप्रिलला मतदान होणार असून, भाजप पुन्हा ‘ऑपरेशन लोटस’च्या तयारीत आहे. तर राष्ट्रवादी आणि शिंदेसेना भाजपवर मात करण्याच्या प्रयत्नात राहणार असल्याचे सांगण्यात येऊ लागले आहे. तरीही या निवडणुकीत प्रशासनासह राजकीय पक्षही ‘हाय टेन्शन’मध्ये राहण्याचीच अधिक शक्यता आहे.

सातारा जिल्हा परिषदेच्या ६५ गटांसाठी ७ फेब्रुवारीला निवडणूक झाली. या निवडणुकीत भाजपने स्वतंत्र बाणा दाखवला. कोरेगाव तालुक्यात शिंदेसेना आणि फलटणला राष्ट्रवादीसाठी काही जागा सोडल्या. अन्यथा सर्वत्र ताकदीने निवडणूक लढविली. तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिंदेसेना समन्वय राखत निवडणुकीला सामोरे गेले. यामध्ये या दोघांनाही चांगले यश मिळाले.

या निवडणुकीत भाजपला २७, राष्ट्रवादी २० आणि शिंदेसेनेला १५ जागा प्राप्त झाल्या. यामध्ये कोणत्याही एका पक्षाला सत्ता स्थापन करणे अवघड होते. कारण बहुमतासाठी ३३ सदस्यांचे पाठबळ लागणार होते. अशावेळी राष्ट्रवादी आणि शिंदेसेना पुन्हा एकत्र आले. त्यांनी सत्तास्थापनेसाठी तयारी केली. तसेच आपले सदस्य अज्ञातस्थळी टूरवर पाठविले. इकडे भाजपला सत्ता हवीच होती. यासाठी जिल्ह्यातील नेतेही आमचाच अध्यक्ष होणार हे सांगत होते.

पुन्हा सत्तासंघर्ष पेटण्याची चिन्हे

जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत भाजपकडे बहुमत नव्हते. पण, ‘ऑपरेशन लोटस’ राबवले. याला शिंदेसेनेच्या दोन आणि राष्ट्रवादीच्या तीन सदस्यांनी साथ दिली. त्यामुळे भाजपच्या ताब्यात सत्ता आली. पण, आता चार सभापतींची निवड होणार आहे. या निवडीच्या वेळीही पुन्हा भाजपविरोधात राष्ट्रवादी आणि शिंदेसेना ठामपणे उभी राहणार आहे. त्यामुळे अध्यक्ष निवडीवेळचा प्रकार पुन्हा घडणार का ? अशी भीतीही व्यक्त होऊ लागली आहे. त्यामुळे सभापती निवडणुकीत प्रशासनाला हाय टेन्शन राहणार आहे. त्याचबरोबर भाजपलाही सभापती पदासाठी पुन्हा जुळणी करावी लागणार आहे. तर राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेला पुन्हा चाल खेळावी लागेल. या निवडणुकीत पुन्हा एकदा सत्तासंघर्ष उभा राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

हात उंचावून मतदान

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण आणि समाजकल्याण समिती त्याचबरोबर इतर दोन विषय समितींच्या सभापतींची निवडणूक ४ एप्रिलला होत आहे. याबाबत जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आदेश काढला आहे. या सभापती निवडीत सकाळी १० ते दुपारी १२ पर्यंत सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार आहेत. त्यानंतर दुपारी एक वाजेनंतर आवश्यकता असल्यास मतदान होणार आहे. पण, साताऱ्यात मतदानानेच सभापती निवड होणार आहे. यासाठी सदस्यांना पुन्हा एकदा हात उंचवावे लागणार आहेत.

Web Title : सतारा जिला परिषद: भाजपा का 'ऑपरेशन लोटस', फिर सत्ता संघर्ष!

Web Summary : सतारा जिला परिषद में फिर सत्ता संघर्ष के आसार हैं क्योंकि भाजपा आगामी समिति अध्यक्ष चुनावों में 'ऑपरेशन लोटस' दोहराने की कोशिश कर रही है, जिससे एनसीपी और शिवसेना गठबंधन को चुनौती मिल रही है।

Web Title : Satara Zilla Parishad: BJP's 'Operation Lotus' sparks power struggle again.

Web Summary : Satara Zilla Parishad anticipates a renewed power struggle as BJP aims to repeat its 'Operation Lotus' strategy in upcoming committee chairperson elections, challenging the coalition of NCP and Shiv Sena.