थंडीची चाहूल लागताच परदेशी पक्षाचे आगमन, येरळवाडी धरणात फ्लेमिंगोचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2021 04:14 PM2021-11-18T16:14:06+5:302021-11-18T16:25:13+5:30

कातरखटाव : गुलाबी थंडीची चाहूल लागल्याने खटाव तालुक्यातील येरळवाडी धरणात परदेशी पाहुणे फ्लेमिंगो (रोहित) पक्षाचे आगमन झाल्याचे दिसून येत ...

Arrival of Foreign Flamingo bird at Yeralwadi Dam satara District | थंडीची चाहूल लागताच परदेशी पक्षाचे आगमन, येरळवाडी धरणात फ्लेमिंगोचे दर्शन

थंडीची चाहूल लागताच परदेशी पक्षाचे आगमन, येरळवाडी धरणात फ्लेमिंगोचे दर्शन

Next

कातरखटाव : गुलाबी थंडीची चाहूल लागल्याने खटाव तालुक्यातील येरळवाडी धरणात परदेशी पाहुणे फ्लेमिंगो (रोहित) पक्षाचे आगमन झाल्याचे दिसून येत आहे.

गेल्या दोन वर्षांत खटाव तालुक्यावर पर्जन्यवृष्टीची कृपादृष्टी चांगली पडली होती. त्यामुळे येरळा धरण सांडव्यातून ओव्हरफ्लो होऊन धो-धो वाहत होते. याचा पर्यटक आनंद घेत होते. अशावेळी धरणामध्ये जादा पाणी असल्याने या पक्ष्यांनी अनेक वर्षे पाठ फिरवली होती. परंतु, यंदा तालुक्यासह अनेक भागात पावसाने दडी मारल्याने यावर्षी येरळा धरणामध्ये अवघा तीस टक्के पाणी साठा आहे. त्यातच परदेशी पाहुण्यांचे येरळेत आगमन झाल्याचे दिसून येत आहे.

फ्लेमिंगो म्हणजेच रोहित पक्षी, पर्यटकांना आणि पक्षिप्रेमींना भुरळ घालणाऱ्या या पक्षाला समुद्रपक्षी म्हणूनही ओळखले जाते. याचा रंग पांढरा, गुलाबी किंवा लालसर असून, उंची साधारणत: दीड मीटर आणि वजन साडेतीन किलोच्या आसपास असते. हे पक्षी पाणपक्षी असल्यामुळे अल्प प्रमाणात पाणी असणाऱ्या सरोवर किंवा तलावाच्या ठिकाणीच राहतात. बहुतेक पक्षी एका ठिकाणी वास्तव करीत नाहीत. कारण त्यांच्या प्रजनन क्षेत्रात हवामान किंवा पातळीत होणाऱ्या बदलांमुळे हे पक्षी वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतर करताना दिसून येतात.

या रोहित पक्ष्याच्या आहाराबद्दल सांगायचे झाले तर सर्वभक्षक, मांसाहारी पक्षी असून, गिधाडापेक्षा मोठा पक्षी आहे.

सूक्ष्मजीव, लहान कीटक, अळ्या, निळे, हिरवे आणि लाल एकपेशीय वनस्पती, लहान मासे अशा पद्धतीने आहार असल्यामुळे कमी पाणी असणाऱ्या पाणथळ ठिकाणी वास्तव्य करतात. याच्या सहा प्रजाती असून, फ्लेमिंगो, चिलियन फ्लेमिंगो, ग्रेटर फ्लेमिंगो, ऑडियान, जेम्स आणि अमेरिकन किंवा करेबियन फ्लेमिंगो या नावाने ओळखल्या जातात.

या पक्ष्याचे वैशिष्ट्य म्हणजे पाणी असणाऱ्या ठिकाणीच राहणे पसंद करतो. आकाराने मोठे असून, त्याचा लांब गळा, काठीसारखे पाय आणि गुलाबी लालसर पंख. उजनी आणि जायकवाडी जलाशयात मोठ्या प्रमाणात हे पक्षी आढळतात. कठीण आणि मजबूत गुलाबी आणि काळ्या रंगाची चोच, लांब मान, या सर्व गोष्टी पाहता आपल्या लक्षात आलेच असेल की रोहित पक्षी कसा आणि त्याची रचना, त्याचे जीवनमान कसे आहे. हे या पक्ष्याचे शारीरिक वैशिष्ट्य असल्यामुळे याला पाहण्यासाठी पर्यटक व पक्षीप्रेमी आतुर असतात. अनेकांना त्याची भुरळ पडते.

थंडीची चाहूल लागली की आमच्या नजरा येरळा धरणाकडे लागलेल्या असतात. त्यामुळे बऱ्याच कालावधीनंतर रोहित पक्ष्यांचे आगमन झाले आहे. चालूवर्षी पावसाने फसविल्यामुळे धरणातला पाणीसाठा फारच कमी झाला आहे. पक्षीही कमी आल्याचे दिसत आहे. पण एकंदरीत समाधान वाटत आहे. -सत्यवान पाटोळे, पर्यटक

Web Title: Arrival of Foreign Flamingo bird at Yeralwadi Dam satara District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.