Satara ZP Election Results 2026: भाजपचे ‘स्वबळा’चे मनसुबे उधळले, सत्तेसाठी ‘राष्ट्रवादी-शिंदेसेना’ एकत्र?
By हणमंत पाटील | Updated: February 10, 2026 17:42 IST2026-02-10T17:42:12+5:302026-02-10T17:42:41+5:30
नेत्यांना अतिआत्मविश्वास नडला

Satara ZP Election Results 2026: भाजपचे ‘स्वबळा’चे मनसुबे उधळले, सत्तेसाठी ‘राष्ट्रवादी-शिंदेसेना’ एकत्र?
हणमंत पाटील
सातारा : जिल्हा परिषदेच्या एकूण ६५ पैकी स्वबळावर सत्तेसाठी किमान ३३ जागा जिंकण्याची रणनीती भाजपच्या नेत्यांनी आखली होती. त्यानुसार सर्वाधिक ६१ जागा लढविल्यानंतरही त्यांना केवळ २७ जागांवर यश मिळाले. भाजपचा ‘स्वबळा’वर सत्तेसाठीचा ‘विजयाचा वारू’ रोखण्यात मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीला (अजित पवार गट) आणि शिंदेसेनेला यश आले. राष्ट्रवादी २० आणि शिंदेसेना १५ असे एकत्र आल्यास सत्तेसाठीच्या ३५ जागांचा जादुई आकडा होऊ शकतो.
सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ढासळण्यात २०२४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीपासून सुरुवात झाली. सातारा लोकसभा आणि आठपैकी निम्म्या जागांवर भाजपला मोठे यश मिळाले. त्यानंतर डिसेंबर २०२५ ला झालेल्या जिल्ह्यातील ९ पैकी ६ नगरपालिका व एका नगरपंचायतीवर भाजपने झेंडा फडकविला. त्यामुळे जिल्ह्यातील भाजपच्या विजयाचा वारू आता जिल्हा परिषदेत पण सत्ता स्थापन करणार, असा अतिआत्मविश्वास भाजपच्या नेत्यांच्या भाषणातून दिसून आला.
त्यांनी मित्र पक्षातील शिंदेसेनेचे नेते व पालकमंत्री शंभूराज देसाई, तसेच राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) नेते मकरंद पाटील यांना टार्गेट केले. मित्रपक्षाचे नेते व उमेदवारांना हालक्यात घेऊन आरोपप्रत्यारोपांची झोड उठविली. मात्र, सातारकरांना ही भाजपच्या नेत्यांची ही जहरी टीकाटिप्पणी रुचली नाही. त्यामुळे मतदारांनी भाजपचे एकहाती सत्तेचे मनसुबे उधळून लावल्याचे निकालावरून दिसून आले.
दोन्ही राष्ट्रवादीच्या ‘अंडरस्टॅडिंग’चा फायदा...
गतपंचावार्षिक निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या सत्तेत निर्विवाद असलेल्या राष्ट्रवादीत २०२२ साली फूट पडली. राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे गट वेगवेगळे झाले. त्यामुळे जिल्हा परिषदेचा गड राखण्याचे त्यांच्यापुढे अवघड आव्हान आहे, हे राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी वेळीच ओळखले. त्यामुळे सबुरीने घेत दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ‘अंडरस्टॅडिंग’चा प्रयोग या निवडणुकीत जिल्हाभर केला. ‘जिल्ह्यातील ज्या गटात ‘घड्याळ’ चिन्हाचा उमेदवार आहे, त्याठिकाणी ‘तुतारी’चा उमेदवार दिला नाही.’ शिवाय निवडणूक प्रचाराच्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाले. या सहानुभूतीचा फायदा राष्ट्रवादी अजित पवार गटाला झाल्याचे निकालावरून दिसून आले.
राजकीय पक्ष - लढविलेल्या जागा -विजयी
- भाजप : ६१ - २७
- राष्ट्रवादी (अ.प) - ३६ - २०
- शिंदेसेना - ३१ - १५
- कॉंग्रेस - ०८ - ०१
- उद्धवसेना - १४ - ००
- राष्ट्रवादी(श.प.) - १० - ००
- स्वाभिमानी - ०२ - ०१
- अपक्ष - २२ - ०१