अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 23:03 IST2025-05-21T22:47:26+5:302025-05-21T23:03:15+5:30
Ajit Pawar: कराडात दिवंगत 'यशवंतरावां'ना अभिवादन, साताऱ्यात मेळाव्याला मार्गदर्शन

अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
प्रमोद सुकरे, कराड
नजीकच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजेच 'मिनी विधानसभे'च्या निवडणूका होवू घातलेल्या आहेत. या निवडणुकांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांची राष्ट्रवादी कामाला लागली आहे. त्याची सुरूवात गुरूवारपासून (२२ मे) साताऱ्यातील मेळाव्यातून होत आहे. पण, तत्पूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे ,महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर हे कराड येथे दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी म्हणजेच राष्ट्रवादीच्या शक्ती स्थळी अभिवादन करून रणशिंग फुंकणार आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुरुवारी (२२ मे) साताऱ्यात पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे.
त्या पार्श्वभूमी बुधवारी रात्रीच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे,महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर कराड मुक्कामी आहेत.गुरुवारी सकाळी कराडच्या प्रीतिसंगमावरील यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतिस्थळी अभिवादन करून ते मिनी विधानसभेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहेत.
वाचा >>पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
त्यानंतर सर्व मान्यवर विरंगुळा निवासस्थानी भेट देणार आहेत. त्यानंतर १० वाजता साताऱ्यातील पोवई नाक्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात होणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.
राष्ट्रवादीने घेतली आघाडी
राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, राज्यसभा खासदार नितीन पाटील, आमदार सचिन पाटील, राष्ट्रवादीचे सातारा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीचा राज्यातील पहिलाच पदाधिकारी, कार्यकर्ता मेळावा साताऱ्यात होत आहे. यानिमित्तानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वात आधी राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी घेतल्याचे बोलले जात आहे.
स्मृतिस्थळ राष्ट्रवादीचे प्रेरणास्थळ
दिवंगत यशवंतराव चव्हाण यांचे कराड येथील स्मृतिस्थळ हे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे स्मृतिस्थळ राहिले आहे.राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार महायुतीत सहभागी झाले. त्यानंतर सर्वप्रथम प्रीतिसंगमावर येऊन अजित पवारांनी यशवंतरावांच्या स्मृतिस्थळी अभिवादन केले होते.तर ज्येष्ठ नेते शरद पवारांनीही याच स्मृतिस्थळी अभिवादन करून महाराष्ट्राचा दौरा सुरू केला होता.