‘लोकमत’च्या वृत्तानंतर संमेलनाध्यक्षांच्या पत्नीचा सन्मान!, समारोप सोहळ्यात व्यासपीठावर स्थान
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 17:11 IST2026-01-05T17:11:07+5:302026-01-05T17:11:40+5:30
99th Marathi Sahitya Sammelan: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आजवरच्या परंपरेनुसार संमेलनाध्यक्षांचा सपत्नीक सत्कार केला जातो आणि त्यांच्या पत्नीला व्यासपीठावर सन्मानाचे स्थान दिले जाते

‘लोकमत’च्या वृत्तानंतर संमेलनाध्यक्षांच्या पत्नीचा सन्मान!, समारोप सोहळ्यात व्यासपीठावर स्थान
संदीप आडनाईक
छत्रपती थोरले शाहू महाराज साहित्यनगरी सातारा : ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांच्या पत्नीला व्यासपीठावर स्थान न मिळाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल अखेर संमेलन महामंडळ व आयोजकांनी घेतली. रविवारी (दि. ४) पार पडलेल्या संमेलनाच्या समारोप सोहळ्यात विश्वास पाटील यांच्या पत्नी चंद्रसेना यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आजवरच्या परंपरेनुसार संमेलनाध्यक्षांचा सपत्नीक सत्कार केला जातो आणि त्यांच्या पत्नीला व्यासपीठावर सन्मानाचे स्थान दिले जाते. मात्र, यंदाच्या उद्घाटन समारंभात ही प्रथा पाळली गेली नाही. विश्वास पाटील यांच्या पत्नी व्यासपीठावर न बसता प्रेक्षागृहात खाली बसलेल्या दिसल्या, तसेच सत्कारातही त्यांचा समावेश करण्यात आला नव्हता. या घटनेची साहित्य वर्तुळात मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली होती.
वाचा : शिवाजी महाराज यांनी सुरत लुटल्याने समृद्धी - रघुवीर चौधरी
‘लोकमत’ने याबाबत वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर साहित्यप्रेमी, अभ्यासक व काही मान्यवरांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. परंपरा, सन्मान आणि संवेदनशीलतेचा मुद्दा उपस्थित होताच आयोजकांवर दबाव वाढला. त्यानंतर समारोप सोहळ्यात संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांच्या पत्नीला मंचावर आमंत्रित करून औपचारिक शब्दांत सन्मान करण्यात आला.
कोण आहेत चंद्रसेना पाटील...
चंद्रसेना पाटील या ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी दिवंगत बाबूराव किवळकर यांच्या भाची (बहिणीची मुलगी) आहेत. बाबूराव किवळकर हे यशवंतराव चव्हाण यांचे ज्येष्ठ सहकारी होते. फलटणचे प्रांताधिकारी असताना १९८८ मध्ये विश्वास पाटील यांचं लग्न झालं होतं.