बारावी परीक्षेची उत्तरपत्रिका अकरावीच्या विद्यार्थिनींकडून तपासल्याची तक्रार; दहिवडी कॉलेजच्या ‘त्या’ शिक्षिकेवर कारवाईचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 13:27 IST2026-03-30T13:26:45+5:302026-03-30T13:27:13+5:30
सातारा : दहिवडी काॅलेज, दहिवडी येथील परीक्षकाने बारावी परीक्षेची उत्तरपत्रिका अकरावीच्या विद्यार्थिनींकडून तपासल्याची तक्रार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च ...

बारावी परीक्षेची उत्तरपत्रिका अकरावीच्या विद्यार्थिनींकडून तपासल्याची तक्रार; दहिवडी कॉलेजच्या ‘त्या’ शिक्षिकेवर कारवाईचे आदेश
सातारा : दहिवडी काॅलेज, दहिवडी येथील परीक्षकाने बारावी परीक्षेची उत्तरपत्रिका अकरावीच्या विद्यार्थिनींकडून तपासल्याची तक्रार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ काेल्हापूर विभागाकडे प्राप्त झाली हाेती. त्या अनुषंगाने त्या परीक्षकाविरुद्ध तात्काळ कारवाई करण्याकामी संबंधित संस्थेस लेखी कळविण्यात आहे. याबाबतचे आदेश काेल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर व सचिव सुभाष चाैगुले यांनी काढले आहेत.
या प्रकरणाची चाैकशी करण्यासाठी विभागीय मंडळामार्फत सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी व विभागीय मंडळाचे सहसचिव यांची द्विसदस्यीय चौकशी समिती नेमण्यात आली. त्यांनी घटनास्थळी जाऊन सर्व संबंधितांचे जाब-जबाब घेतले व चौकशी अहवाल सादर केला. या चौकशीवेळी सातारा जि.प.चे शिक्षणाधिकारी (माध्य.) व माण पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते.
समितीने दिलेल्या अहवालानुसार, दहिवडी काॅलेज, दहिवडी येथील परीक्षक संगीता देशमुख यांनी बारावी अर्थशास्त्र विषयाच्या बोर्डाच्या उत्तरपत्रिका तपासताना उत्तरपत्रिकेवर अकरावीच्या विद्यार्थिनींकडून कोऱ्या पानांवर लाल शाईच्या पेनाने रेषा मारून घेतल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे बोर्डाच्या उत्तरपत्रिका तपासणीकामी अन्य व्यक्तींची मदत घेऊन गोपनीय कामामध्ये कसूर केल्याचे दिसून आले.
अनधिकृत पद्धतीने बोर्डाच्या उत्तरपत्रिका विद्यार्थिनींना हाताळण्यास दिल्या, ही बाब परीक्षक देशमुख यांनी लेखी जबाबात मान्य केली आहे. पडताळणीअंती विद्यार्थिनींनी उत्तरपत्रिका तपासलेल्या नाहीत, ही बाब स्पष्ट झाली आहे.
परीक्षक संगीता देशमुख यांनी उत्तरपत्रिका विद्यार्थिनींना हाताळण्यास देऊन गोपनीयतेचा भंग केल्यामुळे त्यांचे उत्तरपत्रिका तपासणीचे मानधन जप्त करण्यात आले आहे. तसेच त्यांच्याविरुद्ध तात्काळ कारवाई करण्याकामी संबंधित संस्थेस लेखी कळविण्यात आले आहे.
‘त्या’ उत्तरपत्रिकांची फेरतपासणी
देशमुख यांनी तपासलेल्या अर्थशास्त्र विषयाच्या २५० उत्तरपत्रिकांची फेरतपासणी मंडळ स्तरावर मुख्य नियामकांमार्फत करण्यात येणार आहे़. संबंधित परीक्षार्थींचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दक्षता घेण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ काेल्हापूर विभागाने संबंधित शिक्षिकेवर तात्काळ कारवाई करण्याकामी संस्थेस लेखी कळविले आहे. त्यानुसार संस्था अध्यक्ष व सचिव पुढील कारवाई करतील. - धनंजय चाेपडे, शिक्षणाधिकारी (माध्य.) सातारा