Satara: दुर्गादेवी विसर्जनाच्या वेळी सुटीवर आलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू!, कराड तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 15:48 IST2025-10-04T15:47:58+5:302025-10-04T15:48:34+5:30
मृत कर्नाटकातील इंडीचा

Satara: दुर्गादेवी विसर्जनाच्या वेळी सुटीवर आलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू!, कराड तालुक्यातील घटना
कराड : मालखेड (ता. कराड) येथील कृष्णा नदीपात्रात दुर्गादेवी मूर्ती विसर्जना वेळी तरुणाचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. लक्ष्मण औदाप्पा गंगनमल्ली (वय २५ रा. वाठार, कराड) असे मृत तरुणाचे नाव आहे. लक्ष्मण हा दुर्गोत्सवासाठी दोन दिवसांच्या सुट्टीवर बेळगावहून गावी आला असताना, काळाने त्याच्यावर घाला घातल्याची दुर्दैवी घटना घडली.
याबाबतची अधिक माहिती अशी की, मूळचे कर्नाटकातील इंडी परिसरातील असलेले गंगनमल्ली कुटुंब मोलमजुरीसाठी अनेक वर्षांपूर्वी कराड तालुक्यातील वाठार येथे स्थायिक झाले आहे. याच कुटुंबातील लक्ष्मण गंगनमल्ली याचा बुधवारी रात्री दुर्गादेवी विसर्जनाच्या वेळी नदीत बुडून मृत्यू झाला. तो बांधकाम व्यावसायिकाच्या बेळगावमधील साइटवर सध्या नोकरीला होता.
मालखेड गावातील कृष्णा नदीपात्रात दुर्गादेवीचे विसर्जन करण्यासाठी मंडळाचे तरुण गेले होते. त्यावेळी लक्ष्मण हाही नदीच्या पाण्यात उतरला; परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने काही अंतर वाहत जाऊन तो बुडाला. या घटनेची माहिती तालुका पोलिसांना मिळताच, पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी स्थानिक मच्छीमारांना बोलावून शोध मोहीम राबविली. मच्छीमारांनी गळाच्या साह्याने लक्ष्मण गंगनमल्ली याचा मृतदेह पाण्यातून वर काढला आणि रात्री २ वाजता शोध मोहीम संपली.
त्यानंतर, पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. या घटनेची नोंद कराड ग्रामीण पोलिसांत झाली असून, पोलिस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, कुटुंबातील कमावत्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याने गंगनमल्ली कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, वाठार गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेने दुर्गादेवी मंडळातील कार्यकर्त्यांवरही शोककळा पसरली आहे.