भरदिवसा साताऱ्यात कोयत्याने वार करून तरूणाचा खून, गँगवारमधून हा प्रकार घडल्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 13:18 IST2026-01-23T13:17:48+5:302026-01-23T13:18:57+5:30
आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना; पाठीमागून येऊन अचानक हल्ला

भरदिवसा साताऱ्यात कोयत्याने वार करून तरूणाचा खून, गँगवारमधून हा प्रकार घडल्याची शक्यता
सातारा : साताऱ्यातील करंजे पेठेतील आंदेकर चौकात वृषभ राजेंद्र जाधव (वय २८, रा. रविवार पेठ, सातारा) या तरुणाचा डोक्यात कोयत्याने वार करून निर्घृण खून करण्यात आला. हा धक्कादायक प्रकार गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास घडला. गँगवारमधून हा प्रकार घडला असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर येत आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वृषभ जाधव हा गुुरुवारी दुपारी घरीच होता. त्याला कोणाचा तरी फोन आला. तो तातडीने दुचाकीवरून करंजे पेठेतील आंदेकर चाैकात गेला. तेथे गेल्यानंतर तो फोनवर बोलत असतानाच पाठीमागून आलेल्या चाैघांनी त्याच्यावर कोयत्याने हल्ला केला. तो जमिनीवर पडल्यानंतर त्याच्या पायावर कोयत्याने वार करण्यात आले. त्यानंतर त्याला दुचाकीवर बसवून ट्रीपल सीट मंगळवार पेठेत नेण्यात आले. त्या ठिकाणी आणखी काही तरुण आले. त्या तरुणांनीही त्याला बेदम मारहाण केली.
या प्रकाराची माहिती त्याच्या मित्रांना समजल्यानंतर रुग्णवाहिकेतून ऋषभला साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. या प्रकारानंतर साताऱ्यात प्रचंड तणाव निर्माण झाला. खासगी रुग्णालयासमोर जमाव मोठ्या संख्येने जमला.
त्यानंतर शाहूपुरी, सातारा शहर पोलिसांची कुमक त्या ठिकाणी पोहोचली. ऋषभ याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आला. तेथेही तरुणांनी मोठी गर्दी केली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून सिव्हीलसमोर कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, या घटनेची शाहूपुरी पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद झाली होती.
आरोपींचे मोबाइल स्वीच ऑफ
ऋषभ जाधव याचा खून केल्यानंतर आरोपींनी पलायन केले. त्याचा खून कोणी केला, त्यांची नावे पोलिसांना समजली असून, त्यांच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखा, सातारा शहर तसेच शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या टीम विविध ठिकाणी रवाना झाल्या आहेत. आरोपींनी त्यांचे मोबाइल बंद ठेवले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
ही शक्यताही पोलिस पडताळताहेत
तरुणांच्या दोन गटांमध्ये पूर्ववैमनस्यातून वारंवार वाद होत होते. काही वर्षांपूर्वी राजवाडा येथे आप्पा मांढरे यांच्यावर गोळीबार झाला होता. त्या प्रकरणात काही तरुणांवर गुन्हा दाखल झाला होता. त्यातून तर हे गँगवार उफाळून आला नसेल ना, याची शक्यताही पोलिस पडताळून पाहात आहेत.
पोलिस मुख्यालयासमोर तणाव
आरोपींना तातडीने अटक करा, या मागणीसाठी गुरुवारी रात्री पावणेआठ वाजता मोठ्या संख्येने जमाव पोलिस मुख्यालयाजवळ आला. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांना भेटून आरोपींना तत्काळ अटक करा, अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका संतप्त जमावाने घेतली. परंतु अधीक्षक दोशी यांनी पोलिसांची पथके आरोपींना अटक करण्यासाठी रवाना झाली आहेत. लवकरच अटक केली जाईल, असे आश्वासन दिले.