Satara: आरोग्य सुविधांची वानवा; वीटभट्टीवरच महिलेची केली सुखरुप प्रसूती
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 17:06 IST2025-08-30T17:05:41+5:302025-08-30T17:06:27+5:30
वेळ घालवणे धोक्याचे ठरू शकते, हे लक्षात आल्याने त्यांनी तेथेच प्रसूती करण्याचा निर्णय घेतला अन् सुखरूप प्रसूतीही केली.

Satara: आरोग्य सुविधांची वानवा; वीटभट्टीवरच महिलेची केली सुखरुप प्रसूती
मुराद पटेल
शिरवळ : पोटाची खळगी भरण्यासाठी ती खंडाळा तालुक्यातील वीटभट्टीवर काबाडकष्ट करत होती. अचानक तिला प्रसववेदना सुरू झाल्या; पण वीटभट्टीवर कसल्याच सुविधा नव्हत्या. तिची प्रकृती खालावत चालली. त्यामुळे त्यांनी १०८ रुग्णवाहिकेला बोलावून घेतले. त्यातील डॉक्टरांनी तपासणी केली असता बाळ आणि बाळंतीण दोघांनाही धोका असल्याचे लक्षात आले. त्यामुळे थोडाही वेळ घालवणे धोक्याचे ठरू शकते, हे लक्षात आल्याने त्यांनी तेथेच प्रसूती करण्याचा निर्णय घेतला अन् सुखरूप प्रसूतीही केली.
खंडाळा तालुक्यातील पिसाळवाडी गावच्या हद्दीमध्ये एका वीटभट्टीच्या ठिकाणी २५ वर्षीय विवाहिता आपल्या कुटुंबीयांसमवेत राहत आहे. दरम्यान, संबंधित विवाहिता गरोदर असल्याने तिला अचानकपणे मोठ्या प्रमाणात प्रसववेदना सुरू झाल्या. त्यानंतर नातेवाइकांनी १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेच्या विभागाशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला. खंडाळा तालुक्यात १०८ रुग्णवाहिका बाहेर कर्तव्यावर असल्याने पुणे जिल्ह्यातील किकवी, ता. भोर येथील १०८ रुग्णवाहिकेचे डॉ. मंदार माळी यांना यावेळी पाचारण करण्यात आले.
डॉ. मंदार माळी यांनी आजपर्यंत तब्बल १५०० च्या वर सुखरूप प्रसूती केल्या असल्याने त्यांना विस्तृत अनुभव आहे. त्यांनी विवाहितेची तपासणी केली असता प्रसूतीदरम्यान संबंधित विवाहितेच्या प्रसूतीमध्ये मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाल्याने विवाहितेची व पोटातील लहानग्याच्या प्रकृतीला धोका निर्माण झाल्याचे लक्षात आले.
प्रसंगावधान दाखवीत अशक्य वाटणारी गोष्ट डॉ. मंदार माळी यांनी आपले सहकारी चालक दामोदर अहिरे, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका यांच्या सहकार्याने लीलया पार पाडत विवाहितेची प्रसूती घरामध्येच सुखरूपपणे पार पाडत विवाहिता व लहानग्याचा जीव वाचविण्यात यश मिळविले. यावेळी डॉ. मंदार माळी यांनी तत्परता दाखवीत तत्काळ विवाहिता व लहानग्याला शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन गेले. वैद्यकीय अधिकारी डॉ. कीर्ती पवार यांना याबाबतची माहिती देत पुढील उपचाराकरिता सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालयात विवाहिता व लहानग्याला तत्परतेने दाखल केले.
पिसाळवाडी येथे विवाहितेच्या प्रसूतीमध्ये अनेक समस्या निर्माण झाल्याने विवाहितेला रुग्णालयापर्यंत घेऊन जाणे अशक्य झाले होते. माझ्यासमवेत असलेल्या सहकाऱ्यांच्या सहकार्याने सुखरूपपणे विवाहितेची प्रसूती करीत विवाहितेचा व लहानग्याचा जीव वाचविण्यात यश आल्याचे समाधान आहे, अशा भावना रुग्णवाहिकेवरील डॉ. मंदार माळी यांनी व्यक्त केल्या.