Satara News: सेवेत असताना लाच मागितली..निवृत्तीनंतर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 14:20 IST2023-07-27T14:20:05+5:302023-07-27T14:20:34+5:30
गौण खनिज कायद्यांतर्गत कारवाई न करण्यासाठी मागितली होती ५० हजार रुपयांची लाच

Satara News: सेवेत असताना लाच मागितली..निवृत्तीनंतर गुन्हा
पिंपोडे बुद्रुक : पिंपोडे बुद्रुक ता. कोरेगाव येथील एका मंडलाधिकाऱ्याने सेवेत असताना ४० हजारांची लाच मागितली होती. मात्र, निवृत्तीच्या २६ दिवसांनंतर लाचेची मागणी स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्यावर लाच मागणीचा गुन्हा वाठार पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. संजय रावसाहेब बोबडे (रा. पिंपोडे बुद्रुक, ता. कोरेगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या तत्कालीन मंडल अधिकारीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, संजय बोबडे हे मंडल अधिकारी म्हणून पिंपोडे बुद्रुक येथे कार्यरत होते. त्याच दरम्यान मोरबेंद येथील जमिनीतून स्वखर्चाने गाळ मुरूम व माती काढून त्याची वाहतूक करणारे जेसीबी व ट्रॅक्टर जप्त न करण्यासाठी आणि त्याचबरोबर गौण खनिज कायद्यांतर्गत कारवाई न करण्यासाठी बोबडे याने तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांची लाच मागितली होती.
तडजोडअंती ४० हजार रुपये स्वीकारण्यास बोबडे यांनी तयारी दर्शवली होती. २४ मे २०२३ रोजी याची पडताळणी करण्यात आली होती. दरम्यान, बोबडे हे ३० जून २०२३ रोजी शासकीय सेवेतून निवृत्त झाले आहेत. मात्र, पडताळणीमध्ये लाचेची मागणी स्पष्ट झाल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिस उपअधीक्षक उज्ज्वल वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विक्रम पवार, अंमलदार नितीन गोगावले, नीलेश राजपुरे, विक्रमसिंह कणसे यांनी ही कारवाई केली.