पैशांचा पाऊस पाडण्याच्या आमिषाने रत्नागिरीतील एकाला १३ लाखांचा गंडा, साताऱ्यातील एकावर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 14:57 IST2025-08-04T14:57:07+5:302025-08-04T14:57:31+5:30
राजापूर, साताऱ्यात घडला प्रकार

पैशांचा पाऊस पाडण्याच्या आमिषाने रत्नागिरीतील एकाला १३ लाखांचा गंडा, साताऱ्यातील एकावर गुन्हा
सातारा : पैशांचा पाऊस पाडून देतो, असे सांगून तब्बल १३ लाखांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात साताऱ्यातील एका व्यक्तीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष श्रवण लोखंडे (रा. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबत जहीर अब्बास मनचेकर (वय ४०, रा. विलये, ता. राजापूर, रत्नागिरी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, संशयित आरोपीसोबत साताऱ्यातील एका मित्राने ओळख करून दिली. आरोपी हा पैसे दुप्पट करून देतो, अनेकांचा त्याने फायदा केला आहे, असे सांगितले. त्यामुळे त्याच्यावर विश्वास बसला.
संशयित आरोपीने ‘माझ्याकडे स्मशानी शक्ती आहे. त्याचा वापर करून मी पैशांचा पाऊस पाडतो व पैसे डबल करून देतो,’ असे सांगितले. त्यानंतर वेळोवेळी १३ लाख रुपये त्याला दिले. मात्र, त्याने पैसे परत दिले नाहीत. तसेच मित्र अभिषेक साळस्कर मुंबई, उदय सावंत, नथ पुजारी, झिपरू शिंदे यांचीही अशाच प्रकारे फसवणूक केली असल्याचे मनचेकर यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. या तक्रारीनंतर शाहूपुरी पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेण्यासाठी त्याचे घर गाठले. परंतु, संशयित आढळून आला नाही, असे शाहूपुरी पोलिसांनी सांगितले.
राजापूर, साताऱ्यात घडला प्रकार
फसवणुकीचा हा प्रकार जुलै २०१८ ते एप्रिल २०१९ या कालावधीत राजापूर, रत्नागिरी तसेच साताऱ्यातील वाढे फाटा परिसरातील एका लाॅजमध्ये घडला आहे. या घटनेची तक्रार फिर्यादी मनचेकर यांनी २ ऑगस्ट रोजी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली आहे.