Satara Crime: पोलिस त्रास देत असल्याचा आरोप करीत कापून घेतली नस, संबंधिताला घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 13:34 IST2025-11-04T13:32:43+5:302025-11-04T13:34:17+5:30
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी काढण्यात आलेल्या मोर्चावेळी घडली घटना

Satara Crime: पोलिस त्रास देत असल्याचा आरोप करीत कापून घेतली नस, संबंधिताला घेतले ताब्यात
फलटण : जिंती (ता. फलटण) येथील दीपक निंबाळकर या व्यक्तीने फलटण ग्रामीण पोलिसांवर आरोप केले. त्यानंतर मी पोलिसांच्या जाचास कंटाळून आत्महत्या करीत आहे, असे म्हणाला. तसेच, हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सोमवारी (दि.३) सकाळी ११ वाजता येथील पोलिस स्टेशनसमोर मोर्चा काढला. या मोर्चात दीपक निंबाळकर सहभागी झाला होता. यावेळी निंबाळकर म्हणाला, ग्रामीण पोलिस स्टेशनमधील एका पोलिसाने मला कोर्टात खेचून जीवे मारण्याची धमकी दिली होती. माझ्याकडून तो लेखी मागत होता. मी ११२ नंबरवर कॉल करू नये म्हणून मला त्रास देण्यात आला. रात्री ११ वाजेपर्यंत कारण नसताना पोलिस ठाण्यात त्यांनी मला बसवून ठेवले होते. माझ्या पत्नीला गाडीत टाकून इथे आणले, असा आमच्यावर अन्याय झाला आहे.
पोलिसांनी दाखविली सतर्कता...
माझे जिंती गावी आमची शेजाऱ्यांबरोबर भांडणे झाली होती. मी कोकणात काम करतो आणि माझी बायको अपंग आहे. तरीही त्रास दिला जातोय, शेजारील माणसाने माझ्या पत्नीस मारहाण केली. तिच्या पायातील रॉड मोडला. तरीही पोलिसांनी मला खूप त्रास दिला. पोलिसांच्या त्रासाला कंटाळून मी माझी नस कापून आत्महत्या करीत आहे, असे म्हणत खिशातील चाकू काढून स्वत:च्या हातावर वार केले. यावेळी पोलिसांनी सतर्कता दाखवत त्याला ताब्यात घेतले.