Satara: मुंबईतील आयआयटीच्या विद्यार्थांच्या लक्झरी बसला आग, सतर्कतेमुळे ३२ जणांचे प्राण वाचले

By दत्ता यादव | Updated: March 5, 2025 14:01 IST2025-03-05T14:00:35+5:302025-03-05T14:01:29+5:30

आनेवाडी टोलनाक्याजवळील घटना

A luxury bus carrying IIT Mumbai students caught fire near Anewadi toll plaza on the Pune Bangalore National Highway | Satara: मुंबईतील आयआयटीच्या विद्यार्थांच्या लक्झरी बसला आग, सतर्कतेमुळे ३२ जणांचे प्राण वाचले

Satara: मुंबईतील आयआयटीच्या विद्यार्थांच्या लक्झरी बसला आग, सतर्कतेमुळे ३२ जणांचे प्राण वाचले

सातारा : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर आनेवाडी, ता. जावळी टोलनाक्यापासून जवळच मुंबईतील आयआयटीच्या विद्यार्थांच्या लक्झरी बसला अचानक आग लागली. चालकाने प्रसंगावधान दाखवून ३२ मुला-मुलींना तातडीने बसमधून खाली उतरवले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना आज, बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील आयआयटीमध्ये शिक्षण घेणारी ३२ मुले आणि मुली लक्झरी बसने साताऱ्याकडे यायला निघाली. ही मुले सातारा तालुक्यातील चाळकेवाडी येथील सुझलाॅन कंपनीत प्रोजेक्टसाठी येत होती. आनेवाडी टोलनाक्यापासून काही अंतर पुढे आल्यानंतर बसच्या पाठीमागील भागात आग लागल्याचे चालकाच्या निदर्शनास आले.

यानंतर चालकाने बस सेवारस्त्यावर वळवली. तातडीने मुला-मुलींना बसमधून खाली उतरण्यास सांगितले. बसला अचानक आग लागल्याने मुले भयभीत झाली. हातात येतील तशा बॅगा व इतर साहित्य घेऊन मुले काही मिनिटांतच बसमधून खाली उतरली. काही नागरिकांनी तातडीने या घटनेची अग्निशमन दलाला माहिती दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली.

या आगीत बसमधील सीट जळून खाक झाल्या. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नाही. जिल्हा वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक विकास धस आणि भुईंज पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे यांनी या आयआयटीच्या मुलांसाठी दुसरी लक्झरी बस उपलब्ध करून दिली. त्यानंतर मुले चाळकेवाडीकडे आपल्या प्रोजेक्टसाठी रवाना झाली. या घटनेची भुईंज पोलिस ठाण्यात अद्याप नोंद झाली नव्हती. 

Web Title: A luxury bus carrying IIT Mumbai students caught fire near Anewadi toll plaza on the Pune Bangalore National Highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.