लॉप्ट कोसळून कामगाराचा मृत्यू, सातारा रेल्वेस्थानकात बांधकाम सुरू असताना घडली दुर्घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 11:36 AM2024-05-27T11:36:19+5:302024-05-27T11:36:57+5:30

दोषीवर गुन्हा दाखल करा..

A laborer died due to the collapse of a loft, the accident happened during construction at Satara railway station | लॉप्ट कोसळून कामगाराचा मृत्यू, सातारा रेल्वेस्थानकात बांधकाम सुरू असताना घडली दुर्घटना

लॉप्ट कोसळून कामगाराचा मृत्यू, सातारा रेल्वेस्थानकात बांधकाम सुरू असताना घडली दुर्घटना

सातारा : सातारा रेल्वेस्थानकात बांधकाम सुरू असलेल्या पार्सल विभागाच्या इमारतीचा लॉप्ट कोसळून परप्रांतीय कामगाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी ३ च्या सुमारास घडली. अछ्छेलाल अमीरे कोल (वय २३, रा. सिध, मध्य प्रदेश) असे मृत कामगाराचे नाव आहे.

सातारा रेल्वेस्थानकात पार्सल कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या इमारतीच्या खिडक्या, दरवाजाचे काँक्रिटचे लाॅफ्ट तयार करण्यात आले. ९ इंची भिंतीच्या दरवाजावर ५ फूट लांब ३ फूट रुंद तसेच चार इंच जाडीचा अंदाजे २०० किलो वजन असलेला सिमेंटचा लाॅप्ट बसविण्यात आला होता. या लाॅप्टखाली लावण्यात आलेला प्लायवूड कामगार अछ्छेलाल कोल हा काढत होता. त्यावेळी अचानक सिमेंटचा दोनशे किलोचा लाॅप्ट त्याच्या अंगावर पडला. यात कोल याचा जागीच मृत्यू झाला.

दुसरी दुर्घटना

पंधरा दिवसांपूर्वीही याच इमारतीच्या बांधकामावरील लाॅप्ट कोसळून एक कामगार जखमी झाला होता. त्याचे हातपाय फ्रॅक्चर झाले. दुसऱ्यांदा हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

दोषीवर गुन्हा दाखल करा..

इमारतीचे बांधकाम घेतलेले मुख्य ठेकेदार कंपनी मुंबईस्थित असून, त्या कंपनीने दुसरा ठेकेदार नेमला आहे. त्या ठेकेदाराने तिसऱ्या ठेकेदाराला लेबर वर्कवर काम दिले आहे. सध्या हे काम थर्ड पार्टी ठेकेदार करत आहे. याची चाैकशी व्हावी. मयत कामगाराच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची मदत रेल्वे आणि ठेकेदार यांनी द्यावी. सर्व कामगारांचा अपघाती विमा उतरवण्यात यावा. या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी सातारा रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष व सातारा रेल्वे स्टेशनचे सल्लागार समितीचे माजी सदस्य विकास कदम यांनी केली आहे.

Web Title: A laborer died due to the collapse of a loft, the accident happened during construction at Satara railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.