Satara: छातीवर गोंदलेले नाव घालवयचंय; दहा हजार द्या!, मुलीच्या आईकडे तरुणाने केली अजब मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 19:26 IST2025-12-04T19:25:03+5:302025-12-04T19:26:16+5:30
तरुणावर पोक्सोचा गुन्हा दाखल

संग्रहित छाया
सातारा: मी तुमच्या मुलीचे नाव माझ्या छातीवर गोंदले आहे. ते मला घालवायचे आहे. त्यासाठी मला दहा हजार रुपये द्या, अशी अजब मागणी एका तरुणाने मुलीच्या आईकडे केली. या प्रकारानंतर मुलीच्या आईने पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली. संबंधित तरुणावर सातारा शहर पोलिस ठाण्यात पोक्सोसह विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी १७ वर्षांची असून संबंधित तरुण २२ वर्षांचा आहे. दोघेही साताऱ्यातील राहणारे आहेत. पीडित मुलगी एका खासगी क्लासला जाते. त्या ठिकाणी संबंधित तरुणाशी तिची ओळख झाली. दरम्यान, १ डिसेंबरला दुपारी तीनच्या सुमारास पीडित मुलीला त्या तरुणाने ‘स्वत: जीव देण्याची व तुला व तुझ्या घरातल्यांना जीवे मारून टाकण्याची धमकी दिली.’ त्यानंतर आपल्या दुचाकीवर जबरदस्तीने त्या मुलीला बसवून अजिंक्यतारा किल्ल्यावर नेले. तेथे गेल्यानंतर तिला हाताने मारहाण केली.
‘तू आत्ताच्या आता माझ्याशी लग्न नाही केलेस तर मी तुला इथेच जीवे मारून टाकीन,’ अशी त्याने धमकी दिली. तेथून परत घरी आल्यानंतर त्या तरुणाने त्या मुलीच्या आईची भेट घेतली. ‘मी तुमच्या मुलीचे नाव माझ्या छातीवर गोंदले आहे. ते मला घालवायचे आहे. त्यासाठी मला दहा हजार रुपये द्या.’ तुमच्या मुलीला माझ्याशी लग्न करायचे आहे, असे बोललेले व्हिडीओ माझ्याकडे आहेत, असे म्हणून त्याने पैशांची मागणी केल्याचेही मुलीच्या आईने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. पोलिस उपनिरीक्षक राठोड हे अधिक तपास करीत आहेत.