Satara: ब्रेक फेल डंपरने एसटीला २०० फूट नेले फरपटत, नवले पुलावरील दुर्घटनेची पुनरावृत्ती टळली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 15:29 IST2025-11-17T15:28:08+5:302025-11-17T15:29:43+5:30
सात प्रवासी जखमी; झाडांमुळे एसटी दरीत कोसळण्यापासून वाचली

Satara: ब्रेक फेल डंपरने एसटीला २०० फूट नेले फरपटत, नवले पुलावरील दुर्घटनेची पुनरावृत्ती टळली
पेट्री : कास - बामणोली रस्त्यावरील अंधारी फाट्याच्या उतारावर ब्रेक निकामी झालेल्या डंपरने समोरून एसटीला धडक देऊन सुमारे दोनशे फूट फरपटत नेले. यामध्ये सात प्रवासी जखमी झाले. हा अपघाताचा थरार रविवारी सायंकाळी घडला.
कास - बामणोली मार्गावर साताऱ्याहून बामणोलीकडे मालवाहतूक करणारा डंपर निघाला होता. दुपारची तेटली - सातारा एसटी तेटलीहून साताऱ्याकडे येत होती. अंधारी फाट्याजवळ असलेल्या ‘एस’ कॉर्नरवर एसटी आली असता समोरून येत असलेल्या डंपरचा उतारावर ब्रेक निकामी झाला. डंपरने समोरून एसटीला जोरदार धडक देऊन एसटीला दोनशे फूट मागे फरफटत नेले. या प्रकारामुळे एसटीतील २९ प्रवासी भयभीत झाले. ते आरडाओरड करू लागले.
घाटामध्ये असणाऱ्या बॅरिकेट्स व झाडाच्या आधारामुळे एसटी खोल दरीमध्ये कोसळण्यापासून वाचली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. अपघातानंतर तेथून जाणाऱ्या काही वाहन चालकांनी आपली वाहने थांबवून जखमींना एसटीतून बाहेर काढले. तसेच अपघाताच्या आवाजाने आजूबाजूचे स्थानिक ग्रामस्थही मदतीसाठी धावून आले.
रुग्णवाहिका आल्यानंतर जखमींना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यामध्ये कोणीही गंभीर जखमी नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
आगीचा भडका उडण्याच्या भीतीने पळत होते प्रवासी
डंपरने एसटीला फरपटत नेताना सुदैवाने आग लागली नाही, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. पुण्यातील नवले पुलावर कंटेनरने धडक दिल्यानंतर भीषण आग लागली होती. या आगीत काहींचा होरपळून मृत्यू झाला होता. अशाच प्रकारचा हा अपघात झाल्याने एसटीतील प्रवाशांच्या काळजाचा अक्षरश: थरकाप उडाला होता. एसटी थांबल्यानंतर आगीचा भडका होईल, या भीतीने प्रवासी दूरवर पळत होते.