बालविवाह घरात लावला, पोलिस येताच गोंधळ उडाला; साताऱ्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 12:58 IST2025-07-09T12:57:08+5:302025-07-09T12:58:40+5:30
मुला-मुलीच्या आईवरही गुन्हा दाखल

बालविवाह घरात लावला, पोलिस येताच गोंधळ उडाला; साताऱ्यातील घटना
सातारा : १६ वर्षांची वधू, तर १८ वर्षांचा वर. घरात मोजकेच वऱ्हाडी. शुभमंगल सावधान म्हणून वऱ्हाडी मंडळी व नातलगांनी वधू-वराच्या अंगावर अक्षता टाकल्या. वधूच्या गळ्यात वराने मंगळसूत्रही घातलं. एवढ्यात सातारा पालिकेच्या कर्मचाऱ्यांसह पोलिसांनी तेथे धाव घेतली. त्यांना पाहून वऱ्हाडी मंडळींची मात्र पळताभुई थोडी झाली. या बालविवाहप्रकरणी मुला-मुलीच्या आईसह लग्न लावणाऱ्यांवरही सातारा शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. ही घटना सोमवारी (दि. ७) अजंठा चाैक परिसरात घडली.
साताऱ्यातील अजंठा चाैक परिसरातील गोपाळ वस्तीवरील एका घरात बालविवाह लावला जात असल्याची माहिती अज्ञाताने डायल ११२ ला कळविली. पोलिसांनी तातडीने पालिकेच्या अधिकाऱ्यांची संपर्क साधून तेथे जाण्याच्या सूचना दिल्या. पालिकेचे नितीन साखरे यांनी पोलिसांना सोबत घेऊन तातडीने तेथे धाव घेतली. त्यावेळी बालविवाह पार पडला होता.
परंतु तो मी नव्हेच, असे समजून वऱ्हाडी मंडळी इकडे-तिकडे धावाधाव करून लागली. वधूच्या व वराच्या आईसह पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिस गाडीत घालून सर्वांना पोलिस ठाण्यात आणले. बालविवाहास प्रोत्साहन देऊन त्यांचे लग्न लावले, या कारणावरून सातारा शहर पोलिस ठाण्यात पाच जणांवर बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार देशमुख अधिक तपास करीत आहेत.
घराबाहेर आवाज न येता लग्न..
लग्नसमारंभ म्हटलं की नुसता गोंधळ असतो. पण हा बेकायदा मामला असल्याने त्या घरात शांतता होती. घरात काही तरी सुरू आहे, असे काहींना वाटत होते. पण प्रत्यक्षात लग्नसोहळा होता. लपून-छपून हा सोहळा होत असल्याने जागृत नागरिकाने पोलिसांना कळविले आणि या बालविवाहाचा भांडाफोड झाला.