सातारा : जिल्ह्यात यावर्षी पर्जन्यमान अधिक असल्याने मोठ्या प्रकल्पात पाणीसाठा वेगाने वाढला आहे. त्यामुळे कोयना धरणातही दीड महिन्यात जवळपास ६३ टीएमसी पाण्याची आवक झाली. तर साडे तीन टीएमसी पाणी विसर्गाद्वारे सोडण्यात आलेले आहे. सध्या कोयना धरणात ७७ टीएमसीवर साठा असून आतापर्यंत २ हजार ३९४ मिलिमीटर पर्जन्यमानाचीही नोंद झालेली आहे.जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाची उघडीप आहे. पण, पश्चिम बाजुला पावसाचे प्रमाण कमी-अधिक होत आहे. पश्चिमेकडे पावसाने अजून विश्रांती घेतलेली नाही. एक महिन्यापासून सतत पाऊस पडत आहे. कोयना, नवजा, महाबळेश्वर येथे मागीलवर्षीपेक्षा अधिक पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे. त्यामुळे कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी आणि उरमोडी या प्रमुख प्रकल्पातही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढला आहे. विसर्ग होऊनही गुरूवारी सकाळच्या सुमारास या सहा धरणांमध्ये १११ टीएमसीवर पाणीसाठा होता. सुमारे ७५ टक्के ही धरणे भरलेली आहेत.गुरूवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे २० तर नवजाला ४१ आणि महाबळेश्वरमध्ये १९ मिलिमीटरची नोंद झालेली आहे. तर एक जूनपासून आतापर्यंत कोयनेला २ हजार ३९४, नवजा २ हजार ३२७ आणि महाबळेश्वर येथे २ हजार ३६८ मिलिमीटरची नोंद झाली आहे. या पावसामुळे कोयना धरणातही पाण्याची आवक कायम आहे. सकाळच्या सुमारास धरणात १२ हजार ६०२ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणातील पाणीसाठा ७७.४० टीएमसी झालेला. ७३.५४ पाणीसाठ्याची टक्केवारी आहे. धरणाचे दरवाजे आणि पायथा वीजगृहातून एकूण ११ हजार ४०० क्यूसेक विसर्ग हाेत आहे. हे पाणी कोयना नदीद्वारे जात आहे.दरम्यान, सातारा शहरात मंगळवारपासून पावसाची उघडीप आहे. बुधवारी दिवसभर सूर्यदर्शन झाले. तर गुरूवारीही पाऊस पडला नाही. तसेच पूर्व भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यांतही पावसाची उघडीप कायम आहे.पायथा वीजगृहातून सव्वा तीन टीएमसी सोडले पाणी..कोयना धरण पाणलोट क्षेत्रात जून महिन्याच्या मध्यावर पाऊस सुरू झाला. त्यानंतर १५ जूनपासून धरणात पाण्याची आवक होऊ लागली. पावसाचे प्रमाण वाढल्यानंतर आवक वेगाने वाढत गेली. तसेच पाणीसाठाही वाढला. त्यामुळे २० जून रोजी धरणाच्या पायथा वीजगृहाचे एक युनिट सुरू करुन १ हजार ५० विसर्ग सुरू करण्यात आला. त्यानंतर दुसरे युनिट सुरू करून विसर्ग वाढवला. तर दोन दिवसांपूर्वी धरणातील पाणीसाठा ७५ टीएमसीवर गेल्यानंतर सहा दरवाजातून विसर्ग सुरू केला. एक जून ते १६ जुलै या कालावधीत धरणात एकूण ६२.५० टीएमसी पाणी आवक झालेली आहे. तर पायथा वीजगृहातून ३.२० टीएमसी आणि दरवाजातून ०.२० टीएमसी पाणी विसर्ग करण्यात आलेला आहे.
Satara: कोयनेत दीड महिन्यात ६३ टीएमसी पाण्याची आवक, आतापर्यंत पाण्याचा विसर्ग किती.. वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 19:33 IST