वरीच्या भाकरी खाल्ल्याने ५० जणांना विषबाधा, सातारा जिल्ह्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 13:46 IST2025-09-26T13:46:23+5:302025-09-26T13:46:50+5:30
स्थानिक दुकांनामधून खरेदी केले होते वरीचे पीठ

वरीच्या भाकरी खाल्ल्याने ५० जणांना विषबाधा, सातारा जिल्ह्यातील घटना
वडूज (जि. सातारा) : स्थानिक दुकांनामधून वरीच्या पिठामधून तयार केलेल्या भाकरी खाल्ल्यामुळे वडूज व मांडवे येथील ५० जणांना विषबाधा झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही महिलांसह पुरुषांना हातपाय थरथर कापणे, चक्कर येणे आणि अशक्तपणा अशा पद्धतीचा त्रास जाणवू लागला. प्राथमिक माहितीनुसार वडूज पोलिस ठाण्याने नोंद घेऊन संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी दिली.
सध्या नवरात्र उत्सव असल्यामुळे उपवासाला लागणारे खाद्यपदार्थ फळे व फळांच्या रसाचे सेवन केले जाते. यामध्ये भगर, वरीचे तांदूळ, वेफर्स, बर्फी व फळे आदींचा समावेश असतो. परंतु, वरीच्या तांदळाच्या पिठाची भाकरी सेवन करण्याचे प्रमाण सध्या जास्त आहे. त्यामुळे या पिठाला अधिक मागणी असते. वडूज शहरातील काही नामांकित दुकानातून वरीचे पीठ अनेकांनी खरेदी करून नेल्याचे पोलिसांकडून समजते.
बुधवारी (दि. २४) रात्री उशिरा मांडवे गावातील सुनीता जयवंत पाटील, अलका मारुती फडतरे, सीमा सयाजी यादव (रा. मांडवे ), सुभद्रा सुगंधा गुरव (रा. किरकसाल, ता. माण), सुवर्ण प्रकाश पवार व शांता शरद पवार (रा. उंबर्डे), तसेच वडूज येथील केदार किशोर तोडकर व इतर जणांचे रक्ताचे व उलटीचे नमुने तपासणीसाठी पाठविल्याची माहिती पोलिसांनी दिली.