सातारा : सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठी मागणी वाढली आहे. त्यामुळे कोयना धरणातून बुधवारी दुपारपासून विसर्ग वाढविण्यात आला आहे. सध्या ३ हजार ५०० क्यूसेक वेगाने पाणी सोडले जात आहे. तर धरणात ४० टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून तो ३१ मे पर्यंत पुरवावा लागणार आहे.जिल्ह्यात मागीलवर्षी वार्षिक सरासरीच्या सुमारे १२० टक्क्यांहून अधिक पाऊस पडला होता. तसेच कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाचे प्रमाण अधिक राहिले. त्यामुळे कोयना धरण ओव्हरफ्लो झाले. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या या कोयना धरणावरच अनेक गावांची तहान भागत आहे. तसेच हजारो हेक्टर शेतीलाही पाणी मिळते. या धरणातील पाण्याची अधिक करुन तरतूद ही सांगली जिल्ह्यासाठी आहे. त्यामुळे दरवर्षीच सांगली जिल्हा पाटबंधारे विभागाकडून पाण्याची मागणी होते. त्याप्रमाणे धरण व्यवस्थापनकडून पाणी विसर्ग केला जातो. मागील साडे चार महिन्यापासून सांगली पाटबंधारे विभागाच्या मागणीनुसार पाणी सोडले जात आहे. यामध्ये टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात आली आहे.सध्या कडक उन्हाळा असल्याने पाणी टंचाई वाढत चालली आहे. त्यातच नुकतीच सांगली पाटबंधारे विभागाने काेयना धरणातून आणखी पाणी सोडण्याची मागणी केली. त्यानुसार धरणातून बुधवारी दुपारपासून नदी विमोचकातील विसर्ग वाढविण्यात आला. त्यामुळे आता विमोचकातून १ हजार ४०० क्यूसेक विसर्ग नदीत होत आहे. हे पाणी कोयना नदीतून जाणार आहे. तसेच भविष्यातही सांगलीकडून पाणी मागणी वाढणार आहे. त्यादृष्टीने नियोजनाप्रमाणे कोयना धरणातून विसर्ग करावा लागणार आहे.
टेंभू, ताकारी, म्हैसाळ पाणी योजना अवलंबून..कोयना धरणातील पाण्यावर अनेक गावांच्या पिण्याच्या पाणी योजना अवलंबून आहेत. तसेच टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ या प्रमुख तीन सिंचन योजनांसाठीही पाण्याची तरतूद आहे. कोयना धरणातील सर्वाधिक पाण्यावर सांगली जिल्ह्याचा हक्क आहे. त्यामुळे तरतूद आणि मागणीनुसार पाणी सोडावे लागते.