Satara: दराअभावी खटाव उत्तर भागात ३०० ट्रक कांदा पडून, शेतकरी हवालदिल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 19:12 IST2025-12-04T19:11:48+5:302025-12-04T19:12:20+5:30
उकिरड्यावर टाकण्याची वेळ

संग्रहित छाया
केशव जाधव
पुसेगाव : खटाव तालुक्यातील उत्तर भागात रब्बी हंगामातील गारवा कांद्याची लागण मोठ्या प्रमाणात होत असते. हजारो एकर क्षेत्रावर गतवर्षी घेतलेला सुमारे तीनशे ट्रक कांदा केवळ दर व मागणीअभावी नऊ महिने झाले तरीही अद्याप ऐरणीत पडून आहे. कांद्याला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरीवर्ग अडचणीत आला असून, साठवलेला कांदा सडू लागल्याने उकिरड्यावर किंवा रस्त्यावर फेकून द्यायची वेळ येथील शेतकऱ्यांवर आली आहे.
गतवर्षी कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असल्याने दरात नक्कीच वाढ होईल, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांद्याची ऐरणीत साठवणी केली आहे. शासनाचे कृषी विषयक चुकीचे धोरण आणि अन्य कारणांमुळे कांद्याचे भाव चांगलेच कोसळले आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. मोठ्या अपेक्षेने जपलेला कांदा सध्या मातीमोल दराने विकल्याशिवाय पर्याय उपलब्ध नसल्याचे चित्र दिसून येत आहे. नाहीतर शेतकऱ्यांना आपला कांदा रस्त्यावर ओतून देण्याची वेळ आली आहे. साठवलेला कांदा सडू लागल्याने विक्री करावी लागत आहे. त्यातून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी चिंतेत आहे.
कांद्याची रोपे तयार करण्यापासून लागवड ते काढणी आणि साठवणूक करण्यावर खूप मोठा खर्च शेतकऱ्यांचा झालेला आहे. मजुरांना दुप्पट पैसे देऊन कांदा पीक काढणी शेतकऱ्यांना करावी लागली आहे. सध्या काही व्यापाऱ्यांकडून अत्यल्प भावात कांद्याची खरेदी करण्यात येत आहे. काही शेतकऱ्यांनी कांदा चाळीत तर काहींनी ऐरणीत साठवला आहे, साठवलेला कांदा सडत असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. भाव नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी होताना दिसून येत आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या या प्रश्नांकडे लक्ष देऊन याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे.
पाणीपुरीच्या गाडीपासून ते पंचतारांकित हॉटेलपर्यंत सर्वच खाद्यपदार्थ व्यवसायाच्या ठिकाणी कांद्याचा उपयोग होतो. तरीही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय का मिळत नाही? कांद्याचे भाव गडगडले आहेत. किती दिवस शेतकऱ्यांनी आपला कांदा ऐरणीत ठेवायचा? डोळ्यादेखत होणारी कांद्याची नासाडी आता शेतकऱ्यांना पाहवेना. शासनाच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता कांद्याच्या पिकाला हमीभाव जाहीर करावा -सुधाकर फडतरे, कांदा उत्पादक शेतकरी, फडतरवाडी(बुध)