साताऱ्यात १३ वर्षांच्या मुलीवर कॅफेत अत्याचार; पोलिसांकडून छापे, सहा जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 13:37 IST2025-05-08T13:37:31+5:302025-05-08T13:37:49+5:30
सातारा : सातारा शहरातील अंधार कोठडीतील कॅफे पुन्हा एकदा चर्चेत आले असून, कॅफेमध्ये एका १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार ...

साताऱ्यात १३ वर्षांच्या मुलीवर कॅफेत अत्याचार; पोलिसांकडून छापे, सहा जणांवर गुन्हा दाखल
सातारा : सातारा शहरातील अंधार कोठडीतील कॅफे पुन्हा एकदा चर्चेत आले असून, कॅफेमध्ये एका १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणानंतर पोलिसांनी शहरातील विविध ठिकाणी असलेल्या कॅफेवर छापे टाकले. यामध्ये कॅफे मालकासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मागील सहा महिन्यांपूर्वी शहरातील कॅफेमध्ये तरुण-तरुणींकडून अश्लील चाळे केले जात असल्याच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. यानंतर कॅफेमधील पडदे व अंधार कोठडी हटविण्यात आल्या होत्या. परंतु पुन्हा कॅफे चालकांनी महाविद्यालयीन तरुण-तरुणींना आकर्षित करण्यासाठी कॅफेमध्ये अंधार व पडदे लावले.
काही दिवसांपूर्वीच हीच संधी साधून शहरातील एका कॅफेमध्ये १३ वर्षांच्या मुलीवर एका १७ वर्षांच्या तरुणाने अत्याचार केला. हा प्रकार मुलीच्या आईला समजल्यानंतर आईने सातारा शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन संबंधित तरुणावर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी संबंधित तरुणाला ताब्यात घेतले असून, सुधारगृहात त्याची रवानगी करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणानंतर सातारा शहर पोलिसांनी दि. ६ रोजी दुपारी शहरातील राधिका रस्त्यावरील आर. बी. कॅफेवर छापा टाकला. याठिकाणी एक महाविद्यालयीन तरुण आणि तरुणी सापडली. या दोघांना अश्लील कृत्य करण्यास प्रेरणा दिल्याचा ठपका ठेवत कॅफे चालक रोहित गजानन सुतार (वय २५, रा. किन्हई, ता. कोरेगाव) याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
याबाबत हवालदार संतोष घाडगे यांनी फिर्याद दिली आहे. तसेच याच परिसरातील ब्लॅक इन कॅफेवरही पोलिसांनी छापा टाकला. याठिकाणी तरुण, तरुणी आढळून आले. कॅफे चालक सुशांत जितीन धुमाळ (वय २६, रा. सोनके, ता. कोरेगाव) याच्यासह संबंधित तरुण, तरुणीवर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
बैठक व्यवस्था सीसीटीव्हीपासून दूर..
छापा टाकण्यात आलेल्या कॅफेमध्ये बैठक व्यवस्था सीसीटीव्हीपासून दूर ठेवली होती. अंधार करून जोडप्यांना अश्लील कृत्य करण्यास प्रवृत्त केले जात होते. नोंदणी रजिस्टर न ठेवता कॅफेत येणाऱ्यांना प्रवेश दिला जात होता, असे पोलिसांनी सांगितले.