Local Body Election: साताऱ्यात १२७ तडीपारांना दोन तासांसाठी मतदानाचा हक्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 14:11 IST2025-12-01T14:09:14+5:302025-12-01T14:11:09+5:30
आज मध्यरात्रीपासूनच हद्दपारीचे आदेश

Local Body Election: साताऱ्यात १२७ तडीपारांना दोन तासांसाठी मतदानाचा हक्क
सातारा: सातारा पालिका निवडणूक सुरक्षित वातावरणात पार पडावी, यासाठी विविध गुन्हे नावावर दाखल असलेल्या १२७ आरोपींना सातारा शहर व सातारा तालुका परिसरातून तीन दिवसांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. मात्र, मतदानाच्या दिवशी दि. २ डिसेंबर रोजी सकाळी साडेसात ते साडेनऊपर्यंत त्यांना मतदानाचा हक्क बजावण्याची मुभा देण्यात आली आहे.
सातारा पालिकेची निवडणूक १ ते ३ डिसेंबर २०२५ या कालावधीत हाेणार आहे. त्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलिस अधीक्षक डाॅ. वैशाली कडूकर यांनी सातारा नगर पालिका निवडणूक निर्भयपणे पार पाडण्यासाठी सराईत आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाईचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे उप विभागीय पोलिस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ५१ सराईत आरोपींकडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून त्यांना १ डिसेंबर २०२५ ते ३ डिसेंबर २०२५ या कालावधीत सातारा तालुका हद्दीतून हद्दपार करण्यात आले आहे. यामध्ये प्रतापसिंह नगरातील युवराज जाधव, अक्षय आढाव यांचाही समावेश आहे.
दरम्यान, शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एकूण ७६ जणांना हद्दपार करण्यात आले आहे. या संशयितावर खंडणी मागणे, बेकायदेशीर हत्यार जवळ बाळगणे, संगनमत करून शिवीगाळ, दमदाटी करून गंभीर दुखापत करणे यासारखे गंभीर गुन्हे त्यांच्या नावावर दाखल आहेत. या सर्वांना शाहूपुरी पोलिस ठाणे, सातारा शहर आणि सातारा तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत वावर करू नये, असे बजावण्यात आले आहे. परंतु मतदानासाठी त्यांनाही दोन तासांचा वेळ देण्यात आला आहे.