Satara: दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणीत आणखी ११ गुरुजी कारवाईच्या वाटेवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 19:40 IST2025-07-21T19:39:45+5:302025-07-21T19:40:58+5:30

तिसऱ्या यादीत चौघे गैरहजर : आतापर्यंत ३६ जणांच्या प्रमाणपत्रात बोगसपणा !

11 more Gurujis on the verge of action in disability certificate verification in satara | Satara: दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणीत आणखी ११ गुरुजी कारवाईच्या वाटेवर

Satara: दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणीत आणखी ११ गुरुजी कारवाईच्या वाटेवर

सातारा : बदलीत लाभ मिळण्यासाठी दिलेल्या दिव्यांग प्रमाणपत्रांची पडताळणी सुरूच असून, तिसऱ्या यादीत आणखी ११ गुरुजींचे प्रमाणपात्र अयोग्य असल्याचा अहवाल वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून आला आहे. यामुळे आतापर्यंत ३६ प्राथमिक शिक्षकांच्या दिव्यांग प्रमाणपत्रात बोगसपणा दिसून आला आहे. आता या प्रकरणाची व्याप्ती आणखीनच वाढत चालली आहे, तर तिसऱ्या यादीतही चार गुरुजी पडताळणीसाठी गैरहजर राहिले होते.

जिल्हा परिषद प्राथमिक विभागांतर्गत जिल्ह्यात अडीच हजारांहून अधिक शाळा आहेत. या शाळांवर सुमारे सात हजार शिक्षक कार्यरत आहेत. यातील काही शिक्षकांनी बदलीत लाभ मिळण्यासाठी स्वत:चे तसेच कुटुंबातील व्यक्तीचे दिव्यांग आणि आजारपणाचे प्रमाणपत्र दिलेले आहे. शिक्षण विभागाकडे अशा ५८१ प्रमाणपत्रांची माहिती आली. या प्रमाणपत्रांची मागील १५ दिवसांपासून छत्रपती संभाजी महाराज वैद्यकीय महाविद्यालय आणि दिवंगत क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून पडताळणी सुरू झालेली आहे. आतापर्यंत प्राथमिक शिक्षण विभागाकडून तीन याद्या पाठविण्यात आलेल्या होत्या. पडताळणीनंतर त्याचे अहवाल शिक्षण विभागाला प्राप्त झाले आहेत.

शिक्षण विभागाने तिसरी ५३ शिक्षकांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची यादी रुग्णालयाला दिली होती. याची पडताळणी झालेली आहे. यामध्ये ४९ गुरुजींनीच पडताळणीला हजेरी लावली. चाैघेजण गैरहजर राहिले, तर दिव्यांगांची ३४ प्रमाणपत्रे योग्य आढळली. पण, ११ जणांचे दिव्यांग प्रमाणपत्र अमान्य झाले. म्हणजे या प्रमाणपत्रात खोट आहे, तर आता प्रमाणपत्र अमान्य झालेल्या ११ आणि पडताळणीसाठी गैरहजर राहिलेल्या चार असे मिळून १५ जणांना नोटीस पाठविण्यात येणार आहेत. त्यांच्या खुलाशानंतरच पुढील कारवाई होणार आहे.

एक निलंबित; अनेकजण रडारवर, लवकरच कारवाई..

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी या प्रकरणात आतापर्यंत एकाला निलंबित केले आहे. माण तालुक्यातील सोकासन येथील जिल्हा परिषद शाळेतील वरिष्ठ मुख्याध्यापक विनायक पानसांडे यांच्यावर कारवाई झालेली आहे. आता आणखी काहीजण रडारवर आहेत. त्यांच्यावरही लवकरच कारवाई होणार आहे. यामुळे बोगस दिव्यांग प्रमाणपत्र देणाऱ्या गुरुजींचे धाबे आणखीच दणाणले आहेत.

२१५ प्रमाणपत्रांची पडताळणी..

५८१ गुरुजींनी स्वत: आणि नातेवाईक दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र दिलेले आहे. यातील २१५ प्रमाणपत्रांची पडताळणी झालेली आहे. यामध्ये योग्य प्रमाणपत्रे १५३, तर ३६ मध्ये बोगसपणा आढळला, तर १५ शिक्षक पडताळणीसाठी आलेच नाहीत, तर ११ गुरुजींच्या प्रमाणपत्रांची तपासणी पुढील ठिकाणी होणार आहे.

Web Title: 11 more Gurujis on the verge of action in disability certificate verification in satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.