जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुका सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये - देवेंद्र फडणवीस 

By अशोक डोंबाळे | Updated: May 23, 2025 18:28 IST2025-05-23T18:26:40+5:302025-05-23T18:28:01+5:30

सांगलीत भाजपचा मेळावा, जिल्हा परिषदेनंतर महापालिका निवडणुकांचे संकेत

Zilla Parishad Municipal elections in September October says Devendra Fadnavis | जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुका सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये - देवेंद्र फडणवीस 

जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुका सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये - देवेंद्र फडणवीस 

अशोक डोंबाळे

सांगली : भाजप पदाधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केली आहे. त्यांनी आता स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी सज्ज रहावे. सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये प्रथम जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि त्यांच्यासोबतच नगरपालिका निवडणुका होतील. त्यानंतर १५ दिवसांत लगेच महापालिका निवडणुका होतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

सांगलीत शुक्रवारी भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, सत्यजीत देशमुख, गोपीचंद पडळकर, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, भगवान साळुंखे, पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, शहराध्यक्ष प्रकाश ढंग, पृथ्वीराज पवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, दीपक शिंदे, नीता केळकर आदी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, लोकसभा निवडणुकीत भाजपची कामगिरी सुमार झाली होती. या निवडणुकीतील दोष शोधून विधानसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांनी उत्तम कामगिरी करून महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आणली. सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिकांच्या निवडणुका होतील. त्यानंतर १५ दिवसांत महापालिका निवडणुका होणार आहेत. कमी कालावधी असून कार्यकर्त्यांनी निवडणुका जिंकण्यासाठी कामाला लागावे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकल्यानंतर निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

मी पुन्हा येईन..

'मी पुन्हा येईन' तेव्हा कार्यकर्त्यांना सविस्तर मार्गदर्शन करेन. मला पुन्हा येण्याची सवय आहे. त्यामुळे मी नक्की पुन्हा सांगलीला येईन त्यावेळी कार्यकर्त्यांना भरपूर वेळ देईन, असे फडणवीस म्हणताच सभागृहात हशा पिकला. कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून त्यास दाद दिली.

दादांनी ‘तंत्र’ वापरले

फडणवीस म्हणाले, दिल्लीतील बैठकीस मला जायचे होते. यामुळे चंद्रकांत पाटील यांना भाजप मेळाव्यातून तात्काळ मुक्त करण्याची विनंती केली. चंद्रकांत पाटील यांनी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री पदाचे योग्य कौशल्य वापरून मला वेळेत मुक्त केले, त्याबद्दल त्यांचा मी आभारी आहे. फडणवीस यांच्या या वाक्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले.

Web Title: Zilla Parishad Municipal elections in September October says Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.