सांगलीतील तासगावात भावजय, पुतण्याकडून तरुणाचा खून; दोघांना अटक, दोघे संशयित फरारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2023 15:20 IST2023-06-02T13:28:57+5:302023-06-02T15:20:07+5:30

घरातील वस्तू घेऊन गेल्याच्या रागातून सुरज याला चौघांनी बोलावून घेतले. अन् वार केले

Youth killed by brother in law, nephew in Tasgaon in Sangli | सांगलीतील तासगावात भावजय, पुतण्याकडून तरुणाचा खून; दोघांना अटक, दोघे संशयित फरारी

सांगलीतील तासगावात भावजय, पुतण्याकडून तरुणाचा खून; दोघांना अटक, दोघे संशयित फरारी

तासगाव : शहरातील इंदिरानगर येथील सुरज उर्फ लल्या दिनकर शिंदे (वय २०) या तरुणाचा चाकूने वार करून खून करण्यात आला. भावजय, पुतण्या आणि अन्य दोघे अशा चौघांनी मिळून सुरजवर चाकूने वार केले. याप्रकरणी भावजय जानकी दीपक शिंदे, तिचा मुलगा गोपाळ यांना अटक केली आहे. जतीन (पूर्ण नाव समजू शकले नाही) आणि अजय जाधव फरारी आहेत. तासगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, शिंदे कुटुंब इंदिरानगर येथे एकत्र राहते. मात्र, काही दिवसांपासून सुरजचा भावजय व पुतण्याशी वाद सुरू होता. गुरुवारी सकाळी दहाच्या दरम्यान घरातील वस्तू घेऊन गेल्याच्या रागातून सुरज याला चौघांनी बोलावून घेतले. त्यानंतर त्याच्यावर चाकूने पाच वार करून खून करण्यात आला. सुरज उर्फ लल्यावर गळा, खांद्याच्या मागे, डाव्या हाताच्या दंडावर व उजव्या खांद्याजवळ चाकूने वार करण्यात आले. तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि जागीच मृत झाला.

खून झाल्याची माहिती मिळताच तासगाव पोलिसांनी तत्काळ घटनास्थळावर धाव घेत तपासाला सुरुवात केली. याप्रकरणी चौघांची नावे निष्पन्न झाली. मृत सुरज याची भावजय आणि पुतण्या यांना पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले. त्यांच्यासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक बजरंग झेंडे अधिक तपास करत आहेत.

Web Title: Youth killed by brother in law, nephew in Tasgaon in Sangli