सांगलीत तरुणीस पळवून नेऊन लैंगिक अत्याचार; बोरगावच्या तरुणास दहा वर्षांची सक्तमजुरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 19:32 IST2025-10-09T19:32:24+5:302025-10-09T19:32:38+5:30
पीडिता गर्भवती राहिल्यानंतर समोर आली होती घटना

सांगलीत तरुणीस पळवून नेऊन लैंगिक अत्याचार; बोरगावच्या तरुणास दहा वर्षांची सक्तमजुरी
सांगली : कॉलेजला निघालेल्या तरुणीस पळवून नेऊन धमकी देत लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी राहुल मानसिंग चव्हाण (वय २४, रा. झरोना मळा, बोरगाव, ता. तासगाव) याला १० वर्षे सक्तमजुरी व १६ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश जे. ए. मोहंती यांनी हा निकाल दिला. सरकारतर्फे आरती साटविलकर यांनी खटला चालवला.
खटल्याची हकीकत अशी, पीडिता ही दि. २२ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी कॉलेजला जाण्यासाठी निघाली होती. आरोपी राहुल याने तिला कॉलेजला सोडतो असे सांगून दुचाकीवर बसण्यास भाग पाडले. त्यानंतर राहुल याने तिला तासगावात आणले. तेथे एका मोटारीत जबरदस्तीने बसवले. मित्रांच्या मदतीने हातनूर येथील जंगलात नेऊन तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. तिने आरडाओरड करून प्रतिकार करण्याचा प्रयत्न करताच तिला व कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडितेने घरातील लोकांना हा प्रकार सांगितला नाही.
त्यानंतर दि. १६ जून २०२० रोजी पीडितेला पोटदुखीचा त्रास होऊ लागला. घरच्यांनी तिला दवाखान्यात दाखवले. डॉक्टरांनी तपासल्यानंतर ती गर्भवती असल्याचे सांगितले. आई-वडिलांनी चौकशी केल्यानंतर तिने घडलेला प्रकार व आरोपीचे नाव सांगितले. आरोपी राहुल विरुद्ध तासगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तत्कालीन उपनिरीक्षक आर. आर. साळोखे यांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले. त्यानंतर पीडित तरुणीचा गर्भपात केला.
खटल्यात सरकारी वकील आरती साटविलकर यांनी १४ साक्षीदार तपासले. पीडिता, तिचे कुटुंबीय यांचा जबाब, वैद्यकीय पुरावा, रासायनिक विश्लेषण अहवालावरून आरोपी राहुल याला लैंगिक अत्याचाराबद्दल दोषी ठरवले. त्याला दहा वर्षे सक्तमजुरी व १६ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम पीडितेला देण्याचा आदेशही दिला. तासगाव पोलिस ठाण्यातील कर्मचारी रवींद्र माळकर, पैरवी कक्षातील सुनीता कांबळे, रेखा खोत, वंदना मिसाळ यांनी न्यायालयीन कामकाजात सहकार्य केले.