वाल्मिकी घरकुलात थरारक पाठलाग करून तरूणाचा खून; पूर्ववैमनस्यातून घडला प्रकार
By घनशाम नवाथे | Updated: July 12, 2025 22:57 IST2025-07-12T22:56:53+5:302025-07-12T22:57:35+5:30
रेकॉर्डवरील गुन्हेगारासह तीन अल्पवयीन मुलांचा सहभाग

वाल्मिकी घरकुलात थरारक पाठलाग करून तरूणाचा खून; पूर्ववैमनस्यातून घडला प्रकार
सांगली : जुना बुधगाव रस्त्यावरील वाल्मिकी आवास घरकुल परिसरात सौरभ बापू कांबळे (वय २४) याचा भरदिवसा चौघांनी थरारक पाठलाग करून एडक्याने गळ्यावर वार निर्घृण खून केला. दुपारी चारच्या सुमारास हा प्रकार घडला. पूर्ववैमनस्यातून हा खून करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. संशयित हल्लेखोरांमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार आणि तीन अल्पवयीन मुलांचा सहभाग आहे. रात्री उशिरापर्यंत सांगली शहर व स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक संशयिताच्या मागावर होते.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सौरभ कांबळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार अजय कांबळे याचा भाऊ आहे. तो सध्या एका सर्व्हिसिंग सेंटरमध्ये कामाला जात होता. त्याला घोडागाडी पळवण्याचा नाद लागला होता. वाल्मिकी आवास घरकुलात तो राहत होता. त्याच्यावर मारामारीसह दोन गुन्हे शहर पोलिस ठाण्यात दाखल आहे. सौरभ आणि संशयित हल्लेखोर यांच्यात आठ दिवसापुर्वी वादावादी झाली होती. हा राग धुमसत होता.
शनिवारी दुपारी सौरभ वाल्मिकी घरकुल परिसरात आला होता. तेव्हा संशयित चौघेजण परिसरातच होते. त्यांच्यात वादावादी झाल्यानंतर चौघांनी सौरभवर हल्ला चढवला. त्यामुळे तो जीव वाचवण्यासाठी पळाला. परिसरातील इमारत क्रमांक ७ च्या खाली रिकाम्या जागी तो सापडला. त्याच्या गळ्यावर एडक्यासारख्या धारदार शस्त्राने वार करण्यात आला. तसेच दगडाने मारहाण करण्यात आली. एडक्याचा गळ्यावर खोलवर वार झाल्याने रक्तस्त्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. हल्ल्यानंतर चौघेजण तेथून पसार झाले. खूनानंतर वाल्मिकी घरकुल परिसरातील नागरिकांची घटनास्थळी गर्दी केली होती.
खुनाची माहिती मिळताच सांगली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे, गुन्हे प्रकटीकरण विभागाचे उपनिरीक्षक महादेव पोवार यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिस उपाधीक्षक विमला एम., स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली.
प्राथमिक तपासात रेकॉर्डवरील गुन्हेगारासह तीन अल्पवयीन मुलांनी हा खून केल्याची माहिती मिळाली. त्यांच्या शोधासाठी सांगली शहर पोलिस व गुन्हे अन्वेषणचे पथक रवाना झाले. रात्री उशिरापर्यंत संशयितांना पकडण्यासाठी दोन्ही पथकामार्फत प्रयत्न सुरू होते.
मृत गुन्हेगारांच्या टोळीत
मृत सौरभ याचा भाऊ अजय कांबळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर २७ गंभीर गुन्हे दाखल आहेत. सध्या मोका अंतर्गत कारवाईत तो कारागृहात आहे. मृत सौरभ हा वाल्मिकीतील रेकॉर्डवरील गुन्हेगाराच्या टोळीत सहभागी होता. घोडे पळवण्याचा सौरभला नाद होता. त्यातूनही त्याचा काहीजणांशी वाद झाला होता.
मृतावर दोन गुन्हे दाखल
मृत सौरभ कांबळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार अजय कांबळे याचा सख्खा भाऊ आहे. सौरभ याच्याविरूद्ध मारहाणीचा गुन्हा व चोरीचा गुन्हा दाखल आहे. गतवर्षी त्याच्यासह तीन साथीदारांनी पूर्ववैमनस्यातून तरूणास दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा प्रकार घडला होता.
वाल्मिकी घरकुलातील गुन्हेगारी चव्हाट्यावर
वाल्मिकी आवास घरकुल परिसर अशांत टापू म्हणून ओळखला जातो. येथे अनेक गुन्हेगारांचे राजरोस वास्तव्य असते. वर्चस्वातून हाणामारीचे प्रकार घडतात. यापूर्वी परिसरात खुनाचे प्रकार घडले आहेत. येथील गुन्हेगारांकडून परिसरात वाटमारीचे प्रकार सुरूच असतात. पुन्हा एकदा खून झाल्यामुळे गुन्हेगारीचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे.
पोलिस चौकीची गरज
वाल्मिकी परिसर म्हणजे गुंडाचे आगर बनले आहे. त्यामुळे येथे राहणाऱ्या सामान्य, गरीबांना जगणे मुश्किल बनले आहे. गुन्हेगारीमुळे झोपडपट्टी पुनर्वसनात घरे मिळालेले अनेकजण येथे वास्तव्यास येत नाहीत. बेकायदा दारू, मटका, जुगार राजरोस सुरू असतो. याठिकाणी पोलिस चौकी सुरू करण्याची अनेक वर्षापासूनची मागणी आहे.