शिराळा तालुक्यात प्रथमच दिसला पिवळ्या ठिपक्याचा कवड्या साप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 13:22 IST2020-04-21T13:21:41+5:302020-04-21T13:22:53+5:30
पाठीवर पिवळे गडद ठिपके आणि त्याच्यासोबत समांतर रेषा असणारा पिवळ्या ठिपक्यांचा कवड्या हा बिनविषारी साप शिराळा शहरामध्ये प्रथमच दिसला. पण अज्ञातांनी मण्यार जातीचा विषारी सर्प समजून त्याला मारून टाकले.

शिराळा तालुक्यात प्रथमच दिसला पिवळ्या ठिपक्याचा कवड्या साप
शिराळा (जि. सांगली) : पाठीवर पिवळे गडद ठिपके आणि त्याच्यासोबत समांतर रेषा असणारा पिवळ्या ठिपक्यांचा कवड्या हा बिनविषारी साप शिराळा शहरामध्ये प्रथमच दिसला. पण अज्ञातांनी मण्यार जातीचा विषारी सर्प समजून त्याला मारून टाकले.
बिनविषारी असलेला हा साप देशात फार कमी ठिकाणी आढळतो. यापूर्वी मध्य भारत, उत्तर-पश्चिम घाट, मध्य पश्चिम भारत या भागामध्ये या सापाची नोंद आहे.
महाराष्ट्रातील पश्चिम घाटाजवळील काही भागात तसेच नाशिक, पुणे, मुळशी, तळेगाव, सांगली, बुलढाणा तसेच गुजरातमधील काही भागात हा साप आढळल्याचे दिसून येते.
काळ्या शरीरावर ठळक पिवळे ठिपके व त्याला लागूनच समांतर रेषा, तोंडाजवळील ओठाकडचा आणि पोटाकडचा भाग पांढऱ्या रंगाचा दिसून येतो. बऱ्यांचवेळा हा साप मण्यार म्हणून नागरिकांकडून मारला जातो. त्यामुळे या सापाची संख्या फार कमी राहिली आहे.
पूर्ण वाढ झालेल्या या सापाची लांबी एक ते दीड फुटापर्यंत असते. ते साधारणत: रात्रीच्यावेळी बाहेर पडतात आणि पाली, सापसुरळी आदींवर गुजराण करतात. शिराळ्यामध्ये हा साप प्लॅनेट अर्थ फाऊंडेशनचे सर्प अभ्यासक प्रणव महाजन आणि सहकाऱ्यांनी नोंदवला आहे.
या सापाची नोंद महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाच्या शिराळा विभागाच्या लोक जैवविविधता नोंदवहीमध्ये होणार आहे. हा साप सापडला तेव्हा मृतावस्थेत होता. अज्ञातांकडून त्याला मण्यार असल्याचे समजून मारण्यात आले असावे, असा अंदाज वनविभागाने वर्तविला. त्यामुळे या सापाची पहिली नोंद ही मृतावस्थेत झाली आहे. नागरिकांनी कोणताही साप मारू नये. वन विभागाशी संपर्क साधून त्याला सुरक्षितरित्या निसर्गात सोडण्यास मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.