Sangli: आरगमध्ये बचत गटाचे नऊ लाखांचे कर्ज घेऊन महिला गायब, चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 17:55 IST2025-12-06T17:52:52+5:302025-12-06T17:55:07+5:30
बचत गटातील इतर महिलांच्या नावावर बँकेतून पावणे नऊ लाख कर्ज घेतले

Sangli: आरगमध्ये बचत गटाचे नऊ लाखांचे कर्ज घेऊन महिला गायब, चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल
मिरज : आरग (ता. मिरज) येथे परिसरात बचत गटातून घरगुती व्यवसायासाठी नऊ लाखांचे कर्ज घेऊन महिला परिवारासोबत फरार झाली. बचत गटातील महिलांच्या ८ लाख ८० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक प्रकरणी सविता राजकुमार चौगुले (रा. स्टेशन रोड, आरग) यांच्या तक्रारीवरून वंदना प्रताप कवाळे, प्रताप आप्पासाहेब कवाळे, ओंकार प्रताप कवाळे आणि आदित्य प्रताप कवाळे (सर्व रा. आरग, ता. मिरज) यांच्याविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, वंदना कवाळे ही बचत गट चालवत होती. तिने दुसऱ्या बचत गटाची अध्यक्ष मीनाक्षी कोळी, सविता चौगुले व अन्य महिलांचा विश्वास संपादन केला. घरगुती व्यवसायासाठी वंदना कवाळे हिने कोळी यांच्या बचत गटातील सविता चौगुले व इतर महिलांच्या नावावर बँकेतून पावणे नऊ लाख कर्ज घेतले. या कर्जाची रक्कम दीड वर्षात परत फेड करण्याचे तिने आश्वासन दिले.
मात्र, कर्ज फेडण्यासाठी हप्ते न भरता घेतलेली रक्कमही परत दिली नाही. बचत गटातील महिलांनी कर्ज फेडीचा तगादा लावल्याने दि. १८ मे रोजी वंदना कवाळे तिचा पती व दोन मुलांसह घर सोडून गायब झाल्याची तक्रार आहे. यामुळे सविता चौगुले व दहा ते बारा महिलांची आर्थिक फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात चौघा संशयितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.