Sangli Crime: ‘गुप्तधन’च्या आमिषाने महिलेची साडेतीन लाखांची फसवणूक, मिरजेत भोंदूबाबाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 16:30 IST2026-03-18T16:30:30+5:302026-03-18T16:30:30+5:30
चार दिवसांची कोठडी

Sangli Crime: ‘गुप्तधन’च्या आमिषाने महिलेची साडेतीन लाखांची फसवणूक, मिरजेत भोंदूबाबाला अटक
मिरज : भूतबाधा दूर करून घरातील गुप्तधन बाहेर काढण्याच्या आमिषाने मिरजेतील एका महिलेला खोटे सोने देऊन साडेतीन लाखांची फसवणूक करणाऱ्या शशिकांत सीताराम भुजिंगे (वय ३३, रा. पसरीचा नगर, कोल्हापूर; मूळ हलसवडे, ता. करवीर) या भोंदूबाबास मिरज शहर पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यास चार दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.
दि. १७ एप्रिल रोजी भुजिंगे हा मिरजेतील ब्राह्मणपुरी परिसरातील एका महिलेच्या घरी गेला. महिलेचा मुलगा गतिमंद असल्याने त्यास भूतबाधा झाल्याचे सांगून भुजिंगेने स्वतःकडे अघोरी दैवी शक्ती असल्याचा दावा केला. मुलाची भूतबाधा दूर करून घरात सुख-समृद्धी आणून, गुप्तधन काढून देतो, असे सांगत त्याने महिलेचा विश्वास संपादन केला.
यानंतर भुजिंगेने अंधश्रद्धा पसरवत संबंधित महिला व तिच्या नातेवाइकांना मिरजसह कोल्हापूर जिल्ह्यातील मुडशिंगी व नेर्ले परिसरातील माळरानावर नेऊन अघोरी विधी केले. गुप्तधनाच्या नावाखाली खोटे सोने देत त्याने रोख व ऑनलाइन स्वरूपात एकूण ३ लाख २२ हजार रुपये घेतले. मात्र मुलाची प्रकृती सुधारली नाही व दिलेले सोनेही बनावट असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर महिलेने मिरज शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत भुजिंगेला कोल्हापूर येथील एका लॉजवरून ताब्यात घेतले. गुन्ह्यात वापरलेली भुजिंगे याची चारचाकी गाडीही जप्त करण्यात आली आहे.
या फसवणुकीत भुजिंगेला एका महिलेसह आणखी तिघांनी मदत केल्याचे समोर आले असून त्यांनाही ताब्यात घेण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक किरण चौगले यांनी सांगितले. सहायक पोलिस निरीक्षक भैरवनाथ पाटील तसेच नीलेश कदम, प्रवीण वाघमोडे, नितीन मोरे, स्वप्नील नायकोडे, राजेश गवळी आणि दीपक परीट यांच्या पथकाने ही कारवाई केली.