Sangli: पतीशी वाद झाल्याने पत्नीची मुलीसह नदीत उडी घेऊन आत्महत्या, मालगावातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 17:06 IST2025-06-28T17:05:32+5:302025-06-28T17:06:54+5:30

मायलेकी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसल्या. यामुळे पोलिसांनी व रेस्क्यू फोर्सच्या मदतीने नदीपात्रात शोध मोहीम राबविली

Wife commits suicide by jumping into river with daughter after argument with husband, incident in Malgaon Sangli | Sangli: पतीशी वाद झाल्याने पत्नीची मुलीसह नदीत उडी घेऊन आत्महत्या, मालगावातील घटना

Sangli: पतीशी वाद झाल्याने पत्नीची मुलीसह नदीत उडी घेऊन आत्महत्या, मालगावातील घटना

मिरज : मालगाव (ता. मिरज) येथून बेपत्ता झालेल्या माय-लेकींनी कृष्णा नदीत आत्महत्या केली. दोघींचे मृतदेह म्हैसाळ व रायबाग येथे नदीपात्रात सापडले. पतीसोबत किरकोळ कारणावरून वाद झाल्याने दीपाली अमित खांडेकर (वय ३५) व प्राची अमित खांडेकर (वय १६) या मायलेकींनी टोकाचे पाऊल उचलल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

मालगाव ग्रामपंचायतीकडे कर्मचारी असलेले अमित खांडेकर यांचे वीस वर्षांपूर्वी कोल्हापूरच्या दीपाली हिच्याशी लग्न झाले होते. या दाम्पत्यास एक मुलगा व मुलगी प्राची अशी दोन अपत्ये होती. प्राची नुकतीच दहावी उत्तीर्ण झाली होती. घरात पतीशी किरकोळ वाद झाल्याने दीपाली यांनी प्राचीला सोबत घेऊन रविवारी १५ जून रोजी घर सोडले. याबाबत पती अमित खांडेकर यांनी मिरज ग्रामीण पोलिसांत तक्रार दिल्याने पोलिसांनी दोघींचा शोध सुरु केला. यावेळी मिरजेत कृष्णाघाट परिसरात दोघी मायलेकी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसल्या. यामुळे पोलिसांनी व रेस्क्यू फोर्सच्या मदतीने नदीपात्रात शोध मोहीम राबविली. मात्र दोघी सापडल्या नसल्याने शोध मोहीम थांबली.
 
दि. २० जून रोजी मुलगी प्राची खांडेकर हीचा मृतदेह कर्नाटकात रायबाग येथे कृष्णा नदीपात्रात मिळाला. तिच्या नातेवाइकांचा शोध लागला नसल्याने तिच्यावर रायबाग येथेच पोलिसांनी अंत्यसंस्कार केले. त्यानंतर गुरुवारी म्हैसाळ बंधारा केदारनाथ मंदिराजवळ कृष्णा नदीपात्रात वाहत्या पाण्यात दीपाली खांडेकर यांचा मृतदेह दिसला. स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. मायलेकींनी मिरजेत कृष्णाघाट येथून नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचा पोलिसांचा संशय आहे. दोघींच्या आत्महत्येमुळे मालगाव परिसरात हळहळ व्यक्त होत होती. याबाबत ग्रामीण पोलिसांत नोंद आहे.

Web Title: Wife commits suicide by jumping into river with daughter after argument with husband, incident in Malgaon Sangli