Sangli: चारित्र्यावर संशयावरून लाकडाने मारहाण करून पत्नीचा खून, आरोपी पतीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 14:16 IST2026-03-21T14:15:57+5:302026-03-21T14:16:13+5:30
विवाहितेच्या भावाची पोलिसांत फिर्याद

Sangli: चारित्र्यावर संशयावरून लाकडाने मारहाण करून पत्नीचा खून, आरोपी पतीला अटक
आटपाडी : निंबवडे (ता. आटपाडी) येथे चारित्र्यावर संशय घेत लाकडाने मारहाण करून पतीने पत्नीचा खून केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. मंगल अंकुश वाघमारे (वय ३२) असे मृत महिलेचे नाव असून आरोपी अंकुश बाळू वाघमारे (वय ३७, मूळ रा. गायमळा आदिवासी पाडा, ता. सुधागड, जिल्हा रायगड) यास अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगल वाघमारे या पती अंकुश बाळू वाघमारे याच्यासह निंबवडे गावाबाहेरील ओढ्यालगत रामचंद्र मोटे यांच्या शेतात खोपटे बांधून वास्तव्यास होत्या. संबंधित कुटुंब कोळसा तयार करून विक्री करण्याचा व्यवसाय करत होते. त्यांच्यामध्ये मागील काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होते. अंकुश वाघमारे हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत वारंवार पत्नीशी भांडण करत असल्याचे नातेवाइकांनी सांगितले.
दि. १९ मार्च रोजी सकाळी दोघांमध्ये वाद झाला होता. मात्र, नातेवाइकांनी हस्तक्षेप करून तो वाद मिटवला होता. रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास पुन्हा दोघांमध्ये जोरदार भांडण सुरू झाले. या वेळी मंगल वाघमारे हिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून तिचा भाऊ, वहिनी तसेच इतर नातेवाईक धावत घटनास्थळी गेले.
मोबाइलच्या उजेडात पाहिले असता अंकुश वाघमारे हा मंगल हिला लाकडाने मारहाण करत असल्याचे दिसून आले. नातेवाइकांना पाहताच तो घटनास्थळावरून पसार झाला. दरम्यान, गंभीर जखमी अवस्थेत मंगल हिला निंबवडे गावात आणण्यात आले. रुग्णवाहिकेमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर मंगल वाघमारे हिला मृत घोषित केले. त्यानंतर आटपाडी पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह आटपाडी येथील शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवला.
आरोपीला विटा न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली. अधिक तपास पोलिस निरीक्षक विनय बहिर करत आहेत. या प्रकरणी पप्पू अंतू जाधव (वय ३० रा. अंतुले, जि. रायगड) यांनी फिर्याद दिली आहे.