चीनचा निकृष्ट बेदाणा कर चुकवून येत असताना शासन गप्प का?, जयंत पाटील यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 19:16 IST2025-08-08T19:15:05+5:302025-08-08T19:16:24+5:30
सरकारची ही उदासीन भूमिका द्राक्ष उत्पादकांच्या मुळावर उठली आहे

चीनचा निकृष्ट बेदाणा कर चुकवून येत असताना शासन गप्प का?, जयंत पाटील यांचा सवाल
तासगाव : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी चीनमधून होणाऱ्या बेकायदेशीर बेदाणा आयातीवरून सरकारवर जोरदार टीका केली आहे. कर चुकवून आयात होणाऱ्या निकृष्ट बेदाण्यांमुळे राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. वारंवार या प्रश्नाकडे लक्ष वेधूनही सरकार कोणताच निर्णय घेत नसल्याने, सरकार या विषयावर गंभीर आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
आमदार पाटील यांनी सोशल मीडियाद्वारे आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले की, यंदाच्या हंगामात हवामानातील बदलांमुळे द्राक्ष उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामुळे आधीच बेदाणा उत्पादन कमी झाले आहे. अशातच, चीनमधून मोठ्या प्रमाणात कर चुकवून निकृष्ट दर्जाच्या बेदाण्याची आयात होत आहे. या दुहेरी संकटामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून, परकीय गंगाजळीवरही परिणाम होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाला मिळणाऱ्या अपेक्षित दराचे गणित पूर्णपणे बिघडले आहे.
पाटील यांनी सरकारवर टीका करताना सांगितले की, सांगली, नाशिक, जळगाव, सातारा अशा अनेक भागांतील द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत आहेत. या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी त्यांनी पिकवलेल्या बेदाण्याचा शालेय पोषण आहारात समावेश करावा, अशी मागणी आम्ही सातत्याने करत आहोत. एकीकडे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असताना त्यांना कोणतीही मदत मिळाली नाही, आणि दुसरीकडे सरकार चीनमधून बेदाणा आयात करून त्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहे. सरकारची ही उदासीन भूमिका द्राक्ष उत्पादकांच्या मुळावर उठली आहे.
पाटील यांनी सरकारच्या या भूमिकेचा निषेध करत, तात्काळ बेकायदेशीर आयात झालेल्या बेदाण्याची विक्री थांबवावी आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी जोरदार मागणी केली आहे.