स्पेन-इंग्लंडचे व-हाड रंगले कोकरूडच्या लग्नात-: भारतीय संस्कृतीप्रमाणे सर्व विधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 21:31 IST2019-11-11T21:28:06+5:302019-11-11T21:31:43+5:30
वधू पक्षाकडून राचीओ, मारिसोल, आलबेरतो, रूबेन, रिकार्डो, एल्सा, नारिया, बेलेन, इराटी, जुलीया आदी मंडळींनी सर्व विधी पार पाडला. स्पेन आणि इंग्लंडवरुन आलेल्या वधू पक्षाकडील महिला नऊवारी साडी नेसून, तर पुरुष मंडळी भारतीय वेशभूषेत विवाह समारंभात सहभागी झाली होती.

स्पेन-इंग्लंडचे व-हाड रंगले कोकरूडच्या लग्नात-: भारतीय संस्कृतीप्रमाणे सर्व विधी
कोकरुड : कोकरूड (ता. शिराळा) येथील शामराव गमे यांचे पुत्र धनराज यांचा विवाह स्पेनमधील लुईस चवारी यांची कन्या नागोरी हिच्याशी रविवार, दि. १० रोजी अस्वलवाडी येथे भारतीय संस्कृतीप्रमाणे उत्साहात पार पडला. या विवाह सोहळ्यात स्पेन व इंग्लंडमधील व-हाडी मंडळीही सहभागी झाल्याने कार्यक्रमात अनोखा साज चढला होता.
धनराज गमे यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण कोकरुड येथे झाले, तर अभियांत्रिकी शिक्षण कोल्हापूर येथे झाले. शिक्षण झाल्यानंतर त्यांना कंपनीतर्फे इंग्लंड येथे चार वर्षांपूर्वी पाठवण्यात आले. दोन वर्षापूर्वी तेथे स्पेनहून आलेल्या नागोरी हिच्याशी त्यांची ओळख झाली. यातून धनराज आणि नागोरी एकमेकांच्या प्रेमात पडले. एक वर्षापूर्वी धनराज यांनी आपले गाव, घर, नातेवाईक आणि कौटुंबिक परिस्थितीची माहिती देण्यासाठी नागोरी, तिची आई जुलिया, वडील लुईस यांना गावी आणले होते. त्यावेळी धनराज यांनी नागोरी व तिच्या सर्व नातेवाईकांची कुटुंबाशी ओळख करून दिली होती.
दोघांच्या कुटुंबांनी या लग्नाला संमती दिली होती; मात्र लग्न आपल्याकडेच आणि आपल्या संस्कृतीप्रमाणे व्हावे एवढीच अट धनराजच्या कुटुंबियांची होती. त्याप्रमाणे धनराज आणि नागोरी यांचा विवाह रविवारी भारतीय संस्कृतीप्रमाणे मुहूर्तावर पार पडला.
परदेशातील सर्व मंडळी ६ नोव्हेंबर रोजी कोकरूडला दाखल झाली. या सर्व मंडळींना रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले होते. शनिवारी रात्री हळदीचा कार्यक्रम पार पडला. धनराज यांच्या बाजूने गावातील मित्रमंडळी, नातेवाईक, तर वधू पक्षाकडून राचीओ, मारिसोल, आलबेरतो, रूबेन, रिकार्डो, एल्सा, नारिया, बेलेन, इराटी, जुलीया आदी मंडळींनी सर्व विधी पार पाडला. स्पेन आणि इंग्लंडवरुन आलेल्या वधू पक्षाकडील महिला नऊवारी साडी नेसून, तर पुरुष मंडळी भारतीय वेशभूषेत विवाह समारंभात सहभागी झाली होती.
येथील संस्कृती चांगली
नागोरी हिची आई जुलिया आणि वडील लुईस म्हणाले की,आमची मुलगी नागोरी हिने घेतलेला निर्णय योग्य असून, धनराज अत्यंत गुणी मुलगा आहे. येथील संस्कृती चांगली असून, धनराजसह सर्वजण तिचा चांगल्या पद्धतीने सांभाळ करतील.