Sangli: जयंत पाटील यांचा खरा चेहरा जनतेसमोर आणू, पृथ्वीराज पवार यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 19:30 IST2025-09-25T19:30:12+5:302025-09-25T19:30:41+5:30
जयंत पाटील राजकारणातील खलनायकच, जिल्ह्यात विकासात खोडा

Sangli: जयंत पाटील यांचा खरा चेहरा जनतेसमोर आणू, पृथ्वीराज पवार यांचा इशारा
सांगली : लोकनेते राजारामबापू पाटील हे नायक होते, मात्र जयंत पाटीलराजकारणातील खलनायकच आहेत. जिल्ह्याच्या विकासात खोडा घालण्याचे काम त्यांनी केले. त्यांचा खरा चेहरा जनतेसमोर आणू, असा इशारा भाजप नेते व सर्वोदय साखर कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी दिला.
पवार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जयंत पाटील यांनी करेक्ट कार्यक्रमाच्या नावाखाली अनेकांचा विश्वासघात केला. सांगलीच्या स्वाभिमानी जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यांच्या विश्वासघाती राजकारणात अनेकांचा बळी गेला आहे. महाराष्ट्र संस्कृती दाखविण्यासाठी राज्यातील नेते सांगलीत आणून सभा घेतली. ही राजकारणात प्रस्थापितांची झुंडशाही आहे. दिवंगत आर. आर. आबांच्या पत्नी व मुलावर दगडफेक करणाऱ्या हातांना कोणाचे बळ होते? वसंतदादांचे वारस राजकीय पटलावरून नेस्तनाबूत झाले पाहिजेत, यासाठी कोणी कारस्थाने केली हे लोकांसमोर आणणार आहोत.
ज्या लोकांनी राजारामबापू व जयंत पाटील यांना उभे केले, त्यांच्या अस्तित्वावर सत्तेची कुऱ्हाड घातली. कवठेमहांकाळचा महांकांली कारखाना, जतचा डफळे कारखान्याच्या व्यवहाराचा हिशेब मांडणार आहोत. राजारामबापूंना वसंतदादाप्रेमी जनता जिल्ह्यात फिरू देत नव्हती. तेव्हा दिवंगत आमदार संभाजी पवार ढाल बनून त्यांच्या मागे उभे राहिले. जयंत पाटील यांनाही सांगलीत आणले. पण, त्यांनीच कुटील कारस्थाने केले.
शेतकरी संघटनेचे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. बहुजन नेतृत्वाची सतत नाकाबंदी केली. सांगलीच्या विकासात खोडा घातला. कवलापूर विमानतळाच्या १६५ एक जागेचा बाजार असो, सांगली बंधारा पाडण्याचा घाट असो, अनेक कटकारस्थाने रचण्यात आली. जयंत पाटील यांच्या महत्त्वाकांक्षेला बळी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीला सोबत घेऊन लढाई हाती घेणार असल्याचे पवार म्हणाले.