वसंतदादांचे घर आम्ही फोडले नाही; विशाल पाटील यांच्या आरोपावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 12:44 IST2025-06-28T12:43:05+5:302025-06-28T12:44:00+5:30

‘शक्तिपीठ’ला ९० टक्के शेतकऱ्यांचे समर्थन

We did not demolish Vasantdada house Minister Chandrakant Patil gave clarification on Vishal Patil's allegations | वसंतदादांचे घर आम्ही फोडले नाही; विशाल पाटील यांच्या आरोपावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले स्पष्टीकरण

वसंतदादांचे घर आम्ही फोडले नाही; विशाल पाटील यांच्या आरोपावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले स्पष्टीकरण

सांगली : दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतदादा यांचे घर आम्ही फोडलेले नाही. काँग्रेसने अन्याय केला म्हणूनच वसंतदादांच्या नातसून भाजपमध्ये आल्या आहेत. त्यामुळे खासदार विशाल पाटील यांचे हे मत चुकीचे आहे, असे स्पष्टीकरण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केले.

विशाल पाटील यांनी केलेल्या आरोपांबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले, भाजपमध्ये येणाऱ्या कोणत्याही नेत्याला पश्चात्ताप करावा लागला नाही. भाजपने तेवढा सन्मान ठेवला आहे. विशाल पाटील यांना आरोप करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांनी तो केला असेल. जयश्रीताई पाटील यांचा दावा असतानाही त्यांना उमेदवारी दिली नाही. पक्षातून काढून टाकल्यानंतर त्यांना पुन्हा सामावून घेतले नाही, अशा अनेक गोष्टींच्या माध्यमातून काँग्रेसने त्यांच्यावर अन्याय केला. त्यामुळेच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

‘शक्तिपीठ’ला ९० टक्के शेतकऱ्यांचे समर्थन

शक्तिपीठ महामार्गाला राज्यातील ९० टक्के शेतकऱ्यांचे समर्थन मिळाले आहे. उर्वरित ज्या शेतकऱ्यांचा विरोध आहे त्यांचे म्हणणे ऐकून प्रसंगी मार्ग वळविण्यात येईल. कोणाचा विरोध डावलून रस्ता रेटला जाणार नाही. कोणाला त्रास द्यायचा म्हणूनही हा रस्ता आखलेला नाही, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

जयंत पाटील यांच्या प्रवेशाची चर्चा नाही

कोणत्याही नेत्याच्या प्रवेशाचा निर्णय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतात. त्यांनी मनात आणले तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांच्याशी मी चर्चा करेन, पण अशी कोणतीही चर्चा नाही, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

Web Title: We did not demolish Vasantdada house Minister Chandrakant Patil gave clarification on Vishal Patil's allegations