Sangli: वारणा धरणातील पाणीसाठ्यात १० टीएमसी घट, पाझर तलाव पडले कोरडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 17:35 IST2026-03-17T17:35:07+5:302026-03-17T17:35:51+5:30
टंचाईग्रस्त १७ वाड्या व १३ गावांसाठी आराखडा तयार केला

संग्रहित छाया
शिराळा : चांदोली (ता. शिराळा) येथील धरणातून वीजनिर्मिती केंद्र, बाष्पीभवन, कालव्यातून मागणीनुसार पाणी सोडल्याने १०.३१ टीएमसी पाणीसाठा कमी झाला आहे. गतवर्षीपेक्षा हा साठा १.७७ टीएमसीने जादा आहे. टंचाईग्रस्त १७ वाड्या व १३ गावांसाठी आराखडा तयार केला आहे.
चांदोली धरणातून फक्त वीजनिर्मिती केंद्रातून नदीपात्रात १,४७०, तर कालव्यात ३०० असा एकूण १,७७० क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. नदीकाठचे शेतकरी, पाणीपुरवठा योजना, वाकुर्डे बुद्रुक व म्हैसाळ योजनेसाठी पाणी सोडले आहे. या धरणाची ३३.४० टीएमसी क्षमता असून २४.०९ टीएमसी (६९.९२ %) तसेच उपयुक्त साठा १७.१७ टीएमसी (६२.३९%) पाणीसाठा आहे. १०.३१ टीएमसी पाणीसाठा कमी झाला आहे.
गतवर्षी एकूण साठा २२.३२ टीएमसी होता. म्हणजे यावर्षी १.७७ टीएमसी साठा जादा आहे. सध्या बाष्पीभवन होण्याचाही वेग वाढला आहे. मोरणा धरणातून शेतकऱ्यांना पाणी द्यावे तसेच औद्योगिक वसाहतीला पुरवठा करण्यात येणाऱ्या पाण्यात कपात करावी, अशी मागणी होत आहे. मोरणा धरणात ५१%, गिरजवडे ५६%, करमजाई ९८%, अंत्री खुर्द २९%, शिवणी ३२%, टाकवे ३१%, कार्वे २७% व रेठरे धरणात ९% पाणी साठा शिल्लक आहे.
४९ पाझर तलावांपैकी १९ पाझर तलाव कोरडे पडले आहेत. तर ० ते २५ टक्के पाणीसाठा असलेला फक्त १ तलाव आहे, तर २६ ते ५० टक्के पाणीसाठा असलेले २२ तलाव आहेत. याशिवाय ५१ ते ७५ टक्के पाणीसाठा असलेले ५ तलाव असून, ७६ ते १०० टक्के पाणीसाठा असलेले केवळ २ तलाव शिल्लक आहेत. तलावातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. ३३० कुपनलिकांची पाणी पातळी घटत आहे.
शिराळा तालुक्यातील कोरडे झालेले तलाव
हातेगाव (अंबाईवाडी), शिरसटवाडी, निगडी (कासारकी), भाटशिरगाव, निगडी (खोकडखडा), शिरशी (काळे खिंड), शिरशी (भैरववाडा), शिरशी (कासारकी), शिरशी नं. १, पावलेवाडी नं. १, पावलेवाडी नं. २, कोडाईवाडी नंबर १, शिवरवाडी, करमाळे नंबर २, कोडाईवाडी नं. २, तडवळे (वाडदरा), तडवळे नंबर १ हे शिराळा तालुक्यातील तलाव सध्या कोरडे पडले आहेत.