Sangli: नदी उशाला, कोरड घशाला; ऐन पावसाळ्यात पलूस शहरात पाण्याचा ठणठणाट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 18:32 IST2025-07-02T18:32:29+5:302025-07-02T18:32:56+5:30
राष्ट्रवादी उपोषणाच्या पवित्र्यात

संग्रहित छाया
पलूस : पलूस शहरात नदी आहे उशाला, कोरड मात्र घशाला, अशी अवस्था शहराची झाली आहे. शहरात गेल्या आठ दिवसांपासून नळ पाणीपुरवठा खंडित झाला आहे. कुंडल प्रादेशिक पाणीपुरवठा योेजनेचे वीजबिल थकीत असल्याने शहरात पाणीपुरवठ्याची ओरड आहे. आठ दिवसांपासून पलूसमधील नागरिकांना ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी घागर घेऊन भटकंती करावी लागत आहे.
शहराला टँकरने पाणीपुरवठा केला जातो. याला सर्वस्वी नगरपालिका प्रशासक जबाबदार आहेत. शहराला तत्काळ पाणी द्या, अन्यथा नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा जिल्हा राष्ट्रवादी उपाध्यक्ष सागर सुतार यांनी दिला आहे.
नगरपालिका प्रशासनाने पलूस शहरातील नळकनेक्शनधारकांकडून मार्च महिन्यात सक्तीने वसुली केली. अनेकांची नळ कनेक्शन तोडली, डिजिटल बोर्डवरती नावे झळकवली. या मोहिमेत प्रामाणिक नळधारकांनी पाणीपट्टी भरून सहकार्यही केले. आज त्याच लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. मागील आठ दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा बंद आहे. शहरात नगरपालिकेच्या दोन टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
वर्षभरात नळ पाणीपुरवठयाची समस्या येरे माझ्या मागल्या आहे. शहरातील पाण्याची ओरड नेहमीच बनली आहे. आता नागरिकांचा संताप वाढला असून, जेवढे दिवस पाणी तेवढीच पाणीपट्टी घ्या, अशी मागणी होत आहे. नगरपालिका मालकीचे पाण्याचे एटीएम आहे. तेही अनेक महिन्यांपासून ठेकेदारास चालवायला देऊनही बंदच आहे. ते जरी चालू झाले तरी शहराला किमान पिण्याचे शुद्ध पाणी मिळाले.
नगरपालिकेच्या मालकीच्या अनेक बोअरवेल सध्या गंजून बंद पडल्या आहेत. नगरपालिका प्रशासन पाण्यासाठी होणारे हाल उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. तत्काळ पाणीपुरवठा केला नाही तर राष्ट्रवादी उपोषण करणार असल्याचे निवेदन पालिकेच्या अधिकाऱ्यांना आज देण्यात आले आहे.
नगरपालिकेने वीजबिलाची तरतूद लवकर करावी, नगरपालिकेकडे तीन टँकर असताना दोनच टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. खासगी टँकरमालकांची मदत घेऊन जास्तीत जास्त टँकरने पाणीपुरवठा करायला हवा. - सागर सुतार, जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
कुंडल प्रादेशिक नळयोजनेची वीज कनेक्शन हे वीज कंपनीने तोडले आहे. पलूस नगरकपालिकेची असणारी ४ लाख रुपयांची वीजबिल बाकी भरली आहे. या योजनेवरील अन्य कोणाची बाकी थकीत असेल तर नगरपालिका काय करणार? - निर्मिला राशिनकर-यमगर, मुख्याधिकारी, नगरपालिका