दिलीप मोहिते- विटा थील उपनगराध्यक्ष बदलासाठी हालचाली सुरू झाल्या असून, विद्यमान उपनगराध्यक्षा सौ. मालती विश्वनाथ कांबळे यांचा ठरलेला कार्यकाळ पूर्ण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर इच्छुकांनी फिल्डिंग लावली असली तरी, यावेळी नगरसेवक अॅड. सचिन जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. जानेवारीत सौ. कांबळे राजीनामा देणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. विटा नगरपरिषदेत माजी आमदार सदाशिवराव पाटील यांची एकहाती सत्ता आहे. सत्ताधारी गटाचे १५ नगरसेवक असून, अशोकराव गायकवाड यांच्या गटाचे पाच नगरसेवक, तर विरोधी आमदार अनिल बाबर यांच्या स्वाभिमानी विकास आघाडीचे तीन नगरसेवक पालिकेत कार्यरत आहेत. सध्या सत्ताधारी गटाचे वैभव पाटील नगराध्यक्ष, तर सौ. मालती कांबळके उपनगराध्यक्षा आहेत. सौ. कांबळे यांची दि. १८ मेरोजी निवड झाली. त्यावेळी या पदासाठी त्यांच्यासह सत्ताधारी गटाचेच नगरसेवक अॅड. सचिन जाधव प्रमुख इच्छुक होते. त्यांना थांबवून सौ. कांबळे यांना उपनगराध्यक्षपदाची संधी देण्यात आली. आता सौ. कांबळे यांचा कार्यकाल जानेवारी महिन्यात पूर्ण होत आहे. त्यामुळे या पदासाठी पूर्वीचे इच्छुक व नगराध्यक्ष पाटील यांचे विश्वासू अॅड. जाधव यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. मालती कांबळे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात राजीनामा देणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे इच्छुकांची पुन्हा एकदा मोठी गर्दी होण्याची शक्यता असली तरी, जाधव यांनाच संधी मिळणार असल्याची चर्चा आहे. (वार्ताहर)सभापती निवडीची २८ ला प्रक्रियाविषय समित्यांच्या सभापतींचा एक वर्षाचा कार्यकाल २९ रोजी पूर्ण होत आहे. त्यामुळे निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, दि. २८ डिसेंबरला प्रक्रिया होत आहे. दि. २८ रोजी सकाळी ११.३० ते दु. १.३० पर्यंत अर्ज दाखल करणे, दु. १.४० पर्यंत अर्जांची छाननी, दु. १.५५ पर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेणे व त्यानंतर आवश्यकता भासल्यास मतदान घेण्यात येणार आहे. सध्या आरोग्य सभापती म्हणून सौ. स्वाती भिंगारदेवे, बांधकाम सभापतीपदी सौ. लता मेटकरी, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी सौ. प्रतिभा चोथे व शिक्षण समिती सभापतीपदी किरण तारळेकर आहेत.
विटा पालिकेत उपनगराध्यक्ष बदलाच्या हालचाली गतिमान
By admin | Updated: December 23, 2015 01:15 IST