Sangli ZP: विनायक मासाळ, शशिकांत जमदाडे यांना व्हिपचे उल्लंघन भोवणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 18:52 IST2026-03-27T18:52:32+5:302026-03-27T18:52:51+5:30
अपात्रतेची प्रक्रिया होण्याची चिन्हे

Sangli ZP: विनायक मासाळ, शशिकांत जमदाडे यांना व्हिपचे उल्लंघन भोवणार?
सांगली : जिल्हा परिषदेत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीसाठीच्या मतदानावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)च्या दोघा सदस्यांनी भाजप युतीचे मतदान केले होते. त्यांनी व्हिपचा भंग केल्याने त्यांच्यावर अपात्रतेच्या कारवाईच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. व्हिपचे उल्लंघन त्यांना भोवणार का, याकडे लक्ष आहे.
करगणी गटातून निवडून आलेले विनायक मासाळ आणि मणेराजुरी गटातून निवडून आलेले शशिकांत जमदाडे या सदस्यांनी १८ मार्च रोजी अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेत पक्षविरोधी भूमिका घेतली होती. अध्यक्षपदासाठी संगीता पाटील यांनी आणि उपाध्यक्ष पदासाठी ऋषिकेश लाड यांनी मतदान करण्याचा व्हिप पक्षाने जारी केला होता. मात्र या दोघांनी व्हिप डावलून अध्यक्षपदासाठी भाजपच्या स्वप्नाली मासाळ आणि उपाध्यक्षपदासाठी शिंदेसेनेच्या हिंमत जाधव या उमेदवारांना हात उंचावून मतदान केले होते.
त्याची मोठी चर्चा त्यावेळी झाली होती. त्यांच्यावर अपात्रतेच्या कारवाईचे संकेत त्याचवेळी पक्षनेत्यांनी दिले होते; पण गेले आठवडाभर अध्यक्ष-उपाध्यक्षांचे सत्कार, पदग्रहण यांत नेतेमंडळी गुंतून राहिली. आता १ एप्रिल रोजी विषयसमित्यांच्या सभापती निवडीची प्रक्रिया होणार आहे. त्यावेळी या दोघा सदस्यांची भूमिका काय राहील, यावर त्यांच्यावरील कारवाईची दिशा ठरणार आहे.
अध्यक्ष निवडीच्या अगोदर म्हणजे १७ मार्च रोजीच हे सदस्य आपल्या सदस्यांच्या गटातून निघून गेले होते. माजी खासदार संजय पाटील यांच्या भूमिकेनुसार त्यांनी भाजपला मदत केली. अर्थात, त्यांच्या मदतीचा कोणताही फायदा भाजपला होऊ शकला नाही. अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद गमावलेल्या भाजपकडून आता सभापती निवडीवेळी डावपेच आखले जाऊ शकतात. त्यावेळी या दोघा सदस्यांची भूमिका पुन्हा महत्त्वाची ठरणार आहे.
अर्थात, आघाडीकडे स्पष्ट बहुमत असल्याने नेते बिनधास्त आहेत; पण सभापतिपदासाठी धुसफूस झाली, तर त्याचा फायदा भाजपकडून उठवला जाऊ शकतो. अशा वेळी मासाळ आणि जमदाडे यांचे पत्ते भाजपच्या उपयोगाला येऊ शकतात, हे लक्षात घेऊनच त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई सुरू करण्याची पावले उचलली जाण्याची शक्यता आहे.
कारवाईची मागणी
पक्षाचा व्हिप डावलणाऱ्या मासाळ व जमदाडे यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सदस्य व नेत्यांकडून गेल्या काही दिवसांपासून लावून धरण्यात आली आहे; पण स्पष्ट बहुमत असल्याने आघाडीच्या नेत्यांनी ही मागणी अद्याप गांभीर्याने घेतलेली नाही. अर्थात, सभापती निवडीवेळीही दोघांनी विरोधी भूमिका घेतल्यास अपात्रतेसाठी कार्यवाही सुरू केली जाईल, असे सांगण्यात आले.